गणराज रंगी नाचतो - मार्कंडीचा नृत्यगणेश

विवेक मराठी    30-Jan-2026   
Total Views |
Nritya Ganesh
मार्कंडीची गणेशमूर्ती विलक्षण देखणी, प्रमाणबद्ध आणि लयबद्ध आहे. मोजकेच पण ठसठशीत अलंकार गणेशाच्या नृत्यमग्न देहाच्या लयीला बांधून ठेवत नाहीत. सगळीकडे एक आवर्तन दिसते. ही लय महत्त्वाची आहे. कारण भारतीय शिल्पकला नियंत्रित गती दाखवते. म्हणूनच मार्कंडीचा हा नृत्यगणेश केवळ नाचत नाही; तो सृष्टीच्या सृजनात्मक लयीचे प्रतीकात्मक रूप बनतो.
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडा देव मंदिरातील हा नृत्यगणेश म्हणजे भारतीय मूर्तिशास्त्रातील एक अद्वितीय कलाकृती आहे. आपण आपल्या घरी पूजेत ठेवतो तो सौम्य हसणारा, आसनावर शांत बसलेला गणपती हा नाही. हा आहे सृष्टीच्या लयीवर नाचणारा नृत्यगणेश. ही मूर्ती घडवणार्‍या अनाम शिल्पकाराने नृत्यासारख्या प्रवाही प्रक्रियेतला एक सुंदर क्षण दगडात अशा कौशल्याने गोठवून ठेवला आहे की असे वाटते की कुठल्याही क्षणी तो आपला पदविन्यास पूर्ण करेल!
 
 
हिंदू मंदिर ही वास्तू म्हणजे केवळ गाभार्‍यातल्या मूर्तीचे निवासस्थान नसते, तो एक विशाल वास्तूपट असतो आणि त्या पटावर प्रत्येक शिल्पाला एक ठरलेली जागा असते, प्रत्येक देवतेची एक ठरलेली भूमिका असते. श्रीगणेश हा नूतन आरंभाचा देव आहे, म्हणजे केवळ अग्रपूजेचा मान असणारा नव्हे, तर अवकाश आणि अर्थ यांच्या सीमारेषेवर असलेला देव. मार्कंडेय (मार्कंडी) मंदिराच्या बाह्य भिंतीवरील कोनाड्यात कोरलेला हा नृत्यगणेश या भूमिकेचा एक परिपक्व आणि आत्मविश्वासपूर्ण आविष्कार आहे.
 
 
ही मूर्ती नीट निरखून पाहा. श्रीगणेशाचा नृत्यमग्न देह सुंदर त्रिभंगात आहे. त्रिभंग म्हणजे खांदे, कंबर आणि पाय यांना तीन वेगवेगळ्या कोनात वाकवून जोडणारी एक लयबद्ध वक्ररेषा, जी हजारो वर्षांपासून भारतामध्ये नृत्याची लय आणि सौंदर्य व्यक्त करण्यासाठी वापरली जाते. श्रीगणेशाची कंबर डावीकडे वळलेली असताना त्याचे भरदार असे लंबोदर मात्र किंचित उजवीकडे कललेले आहे, जणू त्याचे संपूर्ण शरीर केवळ त्यालाच ऐकू येणार्‍या तालाला प्रतिसाद देत आहे. लता मंगेशकरांनी गायिलेल्या ‘गणराज रंगी नाचतो’ ह्या सुंदर गीतातल्या शांताबाई शेळक्यांच्या ’तुंदील तनु तरी चपल साजिरी, लावण्ये साजतो’ ह्या ओळीच जणू मूर्तरूपात इथे अवतरल्या आहेत. कदाचित ही मूर्ती पाहूनच शांताबाईंना हे काव्य सुचले असावे.
 
 
आता नजर खाली सरकवा. श्रीगणेशाचा उजवा पाय पादपीठावर पूर्णपणे टेकलेला नाही. त्याची बोटे हवेत उचललेली आहेत, फक्त टाच पादपीठाला टेकलेली आहे. तर डावा पाय संपूर्ण शरीराचे वजन पेलतो आहे. नाट्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर ही नृत्ताची, म्हणजे शुद्ध नृत्याची ओळख पटवणारी मुद्रा आहे. शिल्पकाराने येथे केवळ एक स्थिर क्षण नाही तर नृत्याच्या दोन हालचालींमधले संक्रमण पकडले आहे, एक पाऊल वर उचलून पुन्हा जमिनीला स्पर्श करण्याच्या अगदी आधीचा तो निसटता अर्धक्षण इथे दगडात कायमचा कोरून ठेवला गेला आहे.
 
 
 
ही आहे मार्कंडा देव मंदिराची जादू! गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात, वैनगंगा नदीच्या शांत प्रवाहाच्या काठावर उभे असलेले मार्कंडा देवस्थान म्हणजे केवळ एक मंदिर नाही. तो विदर्भाच्या स्मृतीत खोलवर रुजलेला काळ, श्रद्धा आणि स्थापत्याचा आपसातला संवाद आहे. मार्कंडा मंदिराच्या भिंतींवरील शिल्पांची दाटी आणि खजुराहोच्या मंदिरांसारखी मुख्य मंदिराच्या जंघा भागावर तीन स्तरांमध्ये कोरलेली देवी-देवतांची शिल्पे यामुळे मार्कंडा देव मंदिराला ‘विदर्भाचे खजुराहो’ असे संबोधले जाते. ही उपमा केवळ भावनिक नाही; ती दोन्ही मंदिरांच्या स्थापत्यरचनेतल्या साम्यामधून आलेली आहे. आधुनिक काळात हे मंदिर ज्यांनी पहिल्यांदा अभ्यासले त्या अलेक्सान्डर कनिंगहॅम यांनी हे मंदिर दहाव्या शतकात बांधले गेले असावे असे म्हटले आहे तर मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी ह्या मंदिराचा काळ दहाव्या ते अकराव्या शतकातला असावा असे प्रतिपादन केले आहे.
 
 
याआधीच्या लेखात आपण पाहिली ती उदयगिरीची गणेशमूर्ती या गणेशमूर्तीच्या साधारण पाचशे वर्षे आधीची आहे. त्या गणेशमूर्तीकडे पाहिले तर मूर्तिशास्त्राच्या विकासाचा आरंभीचा टप्पा दिसतो. उदयगिरीची गणेशमूर्ती साधी आहे, अनलंकृत आहे, देवाचा देह संक्षिप्त, स्थिर आणि अचल आहे. गुप्तकाळात प्रतिमाशास्त्र स्वत:ची भाषा शोधत होते. भारतीय मूर्तिशास्त्राचे नि. पु. जोशी हिंदू, बौद्ध आणि जैन मूर्तिशास्त्रावरच्या आपल्या पुस्तकात या काळाबाबत लिहिताना स्पष्टपणे म्हणतात की, ‘आरंभीच्या प्रतिमांमध्ये संपूर्ण आयुधसंच नसतो आणि पुढील काळात जे प्रस्थापित प्रतिमाशास्त्र दिसते, त्याची परिपूर्णता येथे आढळत नाही.’
कालमापनाच्या दृष्टीने, भारतीय पुरातत्त्व परंपरेत मार्कंडा मंदिर संकुल साधारण इ.स. 10व्या ते 12व्या शतकात बसवले जाते. स्थापत्य शैलीच्या दृष्टीने पाहिले तर हे मंदिर तोपर्यंत पूर्ण प्रगत झालेल्या उत्तर भारतीय नागर परंपरेशी जोडले गेले आहे. उदयगिरी आणि मार्कंडा ह्या दोन मंदिरांच्या मध्ये जो पाचशे वर्षांचा काळ गेला त्या काळात मूर्तिशास्त्राचा झालेला विकास आपल्याला स्पष्टपणे ह्या दोन गणेशमूर्तींमधल्या फरकात जाणवतो.
 
 
उदयगिरीच्या गणेशमूर्तीचे दुमडलेले कान त्या मूर्तीच्या शिल्पकाराने फार सुंदररित्या दाखवले होते, पण मार्कंडा मंदिरातल्या ह्या नृत्यगणेशाच्या मूर्तीला ज्या अनाम शिल्पकाराने घडवले त्याच्या प्रतिभेची झेप निव्वळ अफाट आहे. नर्तनात रंगून गेलेल्या गणेशाने वरचा उजवा हात इतका सहज उचलला आहे की त्याच्या खालच्या हातातला परशु एका लयबद्ध हालचालीत श्रीगणेशाच्या कानाजवळ येतो. तो कान शिल्पकाराने सहजपणे आतल्या बाजूला वाकवलेला दाखवला आहे. जणू धातूच्या स्पर्शाची चाहूल लागताच हत्तीच्या कानांची झालेली सहज प्रतिक्रिया. दगडातही तो कान जिवंत अवयवासारखा वागतोय. तर श्रीगणेशाची शुंडा तिची स्वतःची नृत्यरचना करत दुमडून वरच्या दिशेने उचललेली आहे.
 
 
गणेशाच्या पादासनाखाली कोरलेला मूषक पुढे झुकलेला आहे, त्याचा देह लांबलेला, मान वर उचललेली आहे आणि पुढच्या पायात नृत्य करताना श्रीगणेशाच्या हातातल्या मोदकपात्रातून घरंगळलेला मोदक मूषकाने घट्ट धरून ठेवलेला आहे. गणेशाच्या दोन्ही बाजूंना अगदी कोपर्‍यात त्याचे गण मृदंग आणि टाळ वाजवत उभे आहेत. श्रीगणेशाच्या हातातली आयुधेही बोलकी आहेत. अंकुश म्हणजे नियंत्रण, परिस्थितीवर नव्हे, तर स्वतःच्या विकारांवर. मोदक म्हणजे आनंद, परंतु तो मिळवण्यासाठी संयम, शिस्त आणि परिपक्वता आवश्यक आहे, याची आठवण करून देणारा नागपाश. खालचा मूषक म्हणजे मानवी इच्छेचे प्रतीक, चपळ, सतत हालणारी, आनंदाचा मोदक नेहमी घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न करणारी इच्छा! नृत्यमग्न गणेश मूषकावर बसलेला नाही पण अंकुश त्याच्या हातात आहे. इच्छा नाकारायच्या नाहीत तर त्यांचे नियमन करायचे हेच जणू ही मूर्ती सांगतेय.
 
 
मार्कंडीची ही गणेशमूर्ती विलक्षण देखणी, प्रमाणबद्ध आणि लयबद्ध आहे, पण अलंकारांनी जडावलेली नाही. अंगावर मोजकेच पण ठसठशीत अलंकार आहेत, डोक्यावर मुकुट आहे पण हे अलंकार गणेशाच्या नृत्यमग्न देहाच्या लयीला बांधून ठेवत नाहीत. श्रीगणेशाचे, लांबसडक बोटे, दुमडलेले पाय, डावीकडे झुकलेले मुख, सगळीकडे एक आवर्तन दिसते. ही लय महत्त्वाची आहे. कारण भारतीय शिल्पकला नियंत्रित गती दाखवते.
 
 
या नृत्यगणेशाच्या मूर्तीचा अभ्यास करताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. नृत्य ही संकल्पना हिंदू प्रतिमाशास्त्रात केवळ सौंदर्यात्मक नसून तात्त्विक आहे. नाट्यशास्त्र आणि अभिनवगुप्ताच्या रससिद्धांतानुसार नृत्य हे केवळ देहाची हालचाल नसून ती एक कला साधना आहे. नृत्य हे चित्ताची अवस्था व्यक्त करणारे, देहाला देवाकडे नेणारे एक माध्यम आहे. म्हणूनच मार्कंडीचा हा नृत्यगणेश केवळ नाचत नाही; तो सृष्टीच्या सृजनात्मक लयीचे प्रतीकात्मक रूप बनतो.
 
 
शैव परंपरेत शिव नटराज म्हणून विश्वनृत्य करतात. त्या पार्श्वभूमीवर गणेशाचा नृत्यरूप अवतार हा अत्यंत अर्थपूर्ण आहे. गणेश हा शिवाचा पुत्र असला तरी येथे तो विघ्नेश्वर म्हणून नव्हे, तर लयेश्वर म्हणून उभा राहतो, त्यामुळे ही मूर्ती केवळ वैयक्तिक भक्तीसाठीचे नाही तर विश्वरचनेवरचे दृश्य भाष्य ठरते. मध्ययुगीन नागर स्थापत्यात देवतांच्या नृत्यमुद्रांचा वापर हा मंदिराला केवळ पूजास्थान न ठेवता एक सजीव अवकाश बनवतो. स्थिर, अचल दगडात गती दाखवणे हे शिल्पकाराचे अंतिम कौशल्य मानले जात असे. मार्कंडीचा नृत्यगणेश हा त्या कौशल्याचा उत्कट नमुना आहे, जिथे दगडाला वजन आहे, पण जडत्व नाही.
 
 
हीच आहे मार्कंडा देव मंदिरातल्या ह्या नृत्यगणेशाच्या मूर्तीची खासियत. पूर, भूकंप, काळाची उलथापालथ आणि दीर्घकाळचे मानवी दुर्लक्ष, सगळे काही सहन करूनही ही मूर्ती हजार वर्षांनंतरही उभी आहे. आजही जेव्हा पहाटेचे सूर्यकिरण या सृष्टीलयीमध्ये हरवलेल्या गणपतीला चरणस्पर्श करतात, तेव्हा हा दगड असा काही उजळून निघतो की, काळाची सगळी पुटे झडून जातात.

शेफाली वैद्य

शेफाली वैद्य या एक लेखिका, सोशल मीडिया प्रभावक आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाष्यकार आहेत, ज्या राजकारण, संस्कृती आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडतात; त्या विशेषतः '#NoBindiNoBusiness' मोहिमेसाठी ओळखल्या जातात आणि त्यांनी विविध माध्यमांवर लेखन केले आहे, तसेच त्या हिंदू स्थापत्यशास्त्र आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक म्हणूनही ओळखल्या जातात.