पावित्र्य आणि शीतलता

विवेक मराठी    31-Jan-2026   
Total Views |
Krittika Nakshatra
Krittika Nakshatra
 
कृत्तिका नक्षत्राचे दैवत ’अग्नी’ आहे. अग्नीचा गुण उष्ण आणि तीक्ष्ण आहे, तर उंबराचा गुण अत्यंत शीत (थंड) आहे. नक्षत्राच्या उष्णतेचे संतुलन राखण्यासाठी निसर्गाने किती विचारपूर्वक या जोडीची निवड केली आहे, हे यावरून दिसून येते. अशा कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी उंबराच्या सान्निध्यात राहिल्यास त्यांच्या मनाला आणि शरीराला शांती मिळते.
भारतीय संस्कृतीत काही वृक्षांना केवळ झाड मानले जात नाही; तर त्यांना साक्षात देवतेचे स्वरूप मानले जाते. ’उंबर’ किंवा ‘औदुंबर’ हा त्यातीलच एक अत्यंत पवित्र वृक्ष. दत्त संप्रदायात या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिथे औदुंबर; तिथे साक्षात् दत्तगुरूंचा वास असतो - अशी भाविकांची श्रद्धा आहे. कृत्तिका नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष केवळ अध्यात्मिकदृष्ट्याच नव्हे, तर आयुर्वेदिक आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातूनही मानवासाठी एक वरदान आहे.
 
 
आयुर्वेदात उंबराला ’हेमदुग्धा’ असे म्हटले आहे. ’हेम’ म्हणजे सुवर्ण आणि ’दुग्ध’ म्हणजे दूध. ज्याच्या चीकामध्ये औषधी गुणधर्म सोन्यासारखे मौल्यवान आहेत, तो हा औदुंबर!
 
Krittika Nakshatra 
 
पुराणांनुसार; भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नृसिंह अवतार धारण केला. हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यानंतर त्याच्या विषारी रक्तामुळे नृसिंहाच्या नखांमध्ये तीव्र दाह (जळजळ) होऊ लागला. हा दाह शमवण्यासाठी नृसिंहाने आपली नखे उंबराच्या बुंध्यात खुपसली, तेव्हा कुठे त्यांना थंडावा मिळाला. तेव्हापासून या वृक्षाला उग्र विष आणि दाह शांत करणारा वृक्ष म्हणून ओळखले जाते. गुरुचरित्राच्या एकोणिसाव्या अध्यायात याविषयी उल्लेख येतो;
 
 
तये समयी महालक्ष्मी । घेऊनि आली अतिप्रेमी ।
औदुंबरफळ नामी । शांतीकारणें नखांसी ॥14॥
तये वेळी शीतलार्थ । नखें रोविलीं औदुंबरात ।
विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ॥15॥
 
इथेच पुढे नृसिंह भगवानांनी दिलेल्या आशीर्वादात अध्यात्माच्या दृष्टीने या वृक्षाचे महत्त्व सांगत असेही म्हटले आहे की;
 
तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान ।
 
अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥21॥
 
 
या अध्यायात औदुंबराला कल्पवृक्ष असे म्हटले आहे. इतकी त्याची महती आहे.
 
कृत्तिका नक्षत्राचे दैवत ’अग्नी’ आहे. अग्नीचा गुण उष्ण आणि तीक्ष्ण आहे, तर उंबराचा गुण अत्यंत शीत (थंड) आहे. नक्षत्राच्या उष्णतेचे संतुलन राखण्यासाठी निसर्गाने किती विचारपूर्वक या जोडीची निवड केली आहे, हे यावरून दिसून येते.
 
 
 
उंबर हा एक सदाहरित आणि प्रचंड विस्तारणारा वृक्ष आहे. याची पाने वडाच्या पानांसारखीच पण थोडी लांबट असतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे याला फुले येत नाहीत (असे मानले जाते), तर खोडाला आणि फांद्यांना थेट फळे लागतात. याची फळे दिसायला अंजिरासारखी असतात. कच्ची फळे हिरवी आणि पिकल्यावर ती लालभडक होतात.
 
उंबराच्या झाडाचे सर्वांत मोठे रहस्य त्याच्या ’फुलांमध्ये’ दडलेले आहे. वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने, उंबर आणि ’ब्लास्टोफॅगा सेनेस’ (Blastophaga psenes) नावाची एक अतिसूक्ष्म गांधीलमाशी यांच्यात एक आश्चर्यकारक सहजीवन असते. उंबराचे फूल फळाच्या आत असते; या विशिष्ट माशीशिवाय उंबराचे परागीभवन अशक्य आहे आणि उंबराच्या फळाशिवाय या माशीची वंशवृद्धी होऊ शकत नाही. निसर्गातील परस्परावलंबनाचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे.
 
 
प्राचीन भारताचे महान शास्त्रज्ञ वराहमिहिर यांनी आपल्या ’बृहत्संहिता’ ग्रंथात ’दकार्गल’ अध्यायात लिहिले आहे की, ज्या ठिकाणी उंबराचे झाड हिरवेगार असते, तिथे जमिनीखाली भरपूर पाणी असते. शेतकर्‍यांसाठी विहीर खणताना उंबराचे झाड हे भूगर्भातील पाण्याचे नैसर्गिक द्योतक मानले जाते. या वृक्षाची मुळे पाणी धरून ठेवतात; ज्यामुळे परिसरातील ओलावा टिकून राहतो.
 
Krittika Nakshatra 
 
आयुर्वेदीय दृष्टीकोनातून पाहता उंबर हा पित्तशामक आणि व्रणरोपण म्हणजेच जखमा बर्‍या करणारा आहे. आयुर्वेदात उंबराचे साल, फळे आणि चीक (Latex) यांचा औषधी वापर केला जातो.
 
आयुर्वेदीय गुणधर्म
 
* रस: कषाय (तुरट) आणि मधुर (गोड).
 
* गुण: गुरू (पचायला जड) आणि रूक्ष (कोरडा).
 
* वीर्य: शीत (अत्यंत थंड).
 
* विपाक: कटू.
 
* दोषघ्नता: हा कफ आणि पित्त दोषांचा नाश करतो. विशेषतः रक्तातील उष्णता कमी करण्यासाठी हे श्रेष्ठ औषध आहे.
चरक संहितेत याचा उल्लेख ’मूत्रसंग्रहणीय’ (लघवीचे विकार थांबवणारे) आणि ’वर्ण्य’ (त्वचेचा रंग सुधारणारे) म्हणून आला आहे.
आरोग्याच्या दृष्टीने पाहता
 
 
उन्हाळ्यात किंवा पित्तामुळे अंगाची आग होत असेल, तर उंबराची पिकलेली फळे खाणे किंवा सालीचा काढा करून पिणे अत्यंत गुणकारी आहे. हाता-पायांची जळजळ होत असल्यास सालीचा लेप लावल्याने त्वरित आराम मिळतो. यासाठीच वैद्यांच्या सल्ल्याने वापरायचे औदुंबरावलेह नामक औषधही आयुर्वेदात वापरले जाते. उंबराची साल रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी आहे. अनेक आयुर्वेदिक ’अँटी-डायबेटिक’ औषधांमध्ये उंबराच्या सालीचा काढा वापरला जातो.
 
 
मासिक पाळीत जास्त रक्तस्राव (Menorrhagia) होत असेल किंवा गर्भपाताची भीती (Threatened abortion) असेल, तर उंबराचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केला जातो. आयुर्वेदात गर्भाला स्थिर करण्यासाठी (गर्भस्थापक) उंबराचा वापर सांगितला आहे.जखम भरून येत नसेल, तर उंबराचा चीक किंवा सालीचा काढा वापरला जातो. याला ’व्रणरोपक’ म्हणतात. गालगुंडावर उंबराचा चीक लावल्यास सूज उतरते. जुलाब होत असल्यास उंबराच्या सालीचा काढा किंवा कच्च्या फळांची भाजी औषध म्हणून दिली जाते. याचा ’तुरट’ गुण जुलाब थांबवतो.
 
 
भारतातील ग्रामीण भागात पशुधनासाठीही उंबराचा वापर होतो. दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी उंबराचा हिरवा पाला चारा म्हणून दिला जातो. तसेच; जनावरांना तोंड आल्यास (FMD- लाळ्या खुरकत) उंबराच्या सालीचा काढा जंतुनाशक म्हणून वापरल्यास जखमा लवकर भरून येतात, हे सिद्ध झाले आहे.
 
 
संशोधन काय सांगते?
 
आधुनिक विज्ञानानुसार; उंबराच्या सालीमध्ये आणि फळांमध्ये ’ग्लुकोल’, ’बी-सिटोस्टेरॉल’ आणि विविध प्रकारचे ’फायटोकेमिकल्स’ असतात.
 
 
* अँटी-इन्फ्लेमेटरी: हे शरीरातील अंतर्गत सूज कमी करते.
 
* हेपाटोप्रोटेक्टिव्ह : यकृताच्या संरक्षणासाठी उंबराचा अर्क उपयुक्त असल्याचे काही उंदीरांवरील प्रयोगांत दिसून आले आहे.
 
* अँटी-बॅक्टेरियल: याच्या पानांचे अर्क अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांचा नाश करण्यास सक्षम आहेत.
 
केवळ औषध म्हणूनच नाही; तर ’सुपरफूड’ म्हणूनही उंबराकडे पाहिले जात आहे. संशोधनात असे आढळले आहे की; उंबराच्या फळांमध्ये लोह आणि कॅल्शियम प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे ’अ‍ॅनिमिया’ (रक्तक्षय) आणि हाडांच्या ठिसूळपणावर हे नैसर्गिक पूरक आहार ठरू शकते. तसेच, यातील ’अँटी-ऑक्सिडंट’ गुणधर्म शरीरातील ’फ्री रॅडिकल्स’चा नाश करून पेशींचे म्हातारपण रोखण्यास मदत करतात. काही प्राथमिक संशोधनानुसार, उंबराच्या पानांचा अर्क स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि ’अल्झायमर’ सारख्या व्याधींमध्ये मेंदूच्या पेशींचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
 
 
कृत्तिका नक्षत्र हे ’कापणार्‍या’ किंवा ’तीक्ष्ण’ स्वभावाचे नक्षत्र मानले जाते (जसे कातरी किंवा चाकू). त्यातच त्याचा स्वामी ’अग्नी’ आहे. या तीक्ष्णतेला आणि उष्णतेला शांत करण्यासाठी निसर्गाने ’उंबर’ हा सौम्य आणि शीतल वृक्ष निवडला आहे. ज्यांच्या पत्रिकेत उष्णतेचे विकार किंवा रागीट स्वभाव आहे, अशा कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी उंबराच्या सान्निध्यात राहिल्यास त्यांच्या मनाला आणि शरीराला शांती मिळते.
 
 
आजच्या सिमेंटच्या जंगलात ’उंबर’ दुर्मीळ होत चालला आहे. पक्ष्यांचे, कीटकांचे आणि खारुताईंचे हे हक्काचे घर आहे. उंबराचे झाड तोडणे हे महापाप मानले जाते; ते केवळ धार्मिक कारणासाठी नाही, तर त्याच्या पर्यावरणीय महत्त्वामुळेच! त्यामुळे आपल्या शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत एक तरी औदुंबर असावा, जो जमिनीतील पाणी आणि घरातील आरोग्य दोन्ही टिकवून ठेवेल.
 
लेखक आयुर्वेद वाचस्पति आहेत.

वैद्य परीक्षित शेवडे

वैद्य परीक्षित शेवडे हे एक आयुर्वेदिक डॉक्टर, लेखक आणि वक्ते आहेत,  आयुर्वेदाच्या तत्त्वांचा आणि आधुनिक विज्ञानाचा वापर करून आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात, विशेषतः 'आयुर्वेद वाचस्पति' म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांचे लेख, पुस्तके तसेच समाज माध्यमांवरून ते लोकांपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती करतात..