जवाहर‘लाल’ ते ‘लाल’बहादुर

विवेक मराठी    31-Jan-2026   
Total Views |

neharu to bahadur shastri 
20 ऑक्टोबर 1962 या दिवशी चीनने आकस्मिक आक्रमण केले. तितक्याच आकस्मिकपणे 21 नोव्हेंबर 1962 या दिवशी त्याने एकतर्फी युद्धबंदी घोषित केली. चीनच्या या विश्वासघाताने पंडित नेहरूंना फारच मोठा मानसिक धक्का बसला. अहिंसा, प्रेम, जागतिक शांतता इत्यादी यांचे आदर्श एका फटक्यात रद्दबातल झाले. पंडित नेहरू खचले. पुढच्या अवघ्या दीड वर्षात त्यांचे निधन झाले. आता लालबहादुर शास्त्री हे पंतप्रधान झाले. पाकिस्तानी फील्ड मार्शल आयुब खान हा घटनाक्रम बारकाईने बघत होताच.
अ‍ॅग्रेसिव्ह मराठा नको
 
सैनिकी दलांना ’अन्प्रॉडक्टिव्ह’ म्हटल्यामुळे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन आणि सेनाप्रमुख जनरल थिमय्या यांचा जोरदार खटका उडाला. जनरल थिमय्यांनी ताडकन राजीनामाच दिला. पण पंडित नेहरूंनी त्यांची समजूत काढून त्यांना तो मागे घ्यायला लावला. ही 1959 सालची गोष्ट. लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात (शंकरराव पांडुरंगराव पाटील-थोरात) हे तेव्हा भारतीय सैन्याच्या ईस्टर्न कमांडचे मुख्य सेनापती होते. जनरल थोरातांनी मार्च 1960 मध्ये ईस्टर्न कमांडचे मुख्यालय असलेल्या लखनौ शहरात ’लाल किल्ला युद्धसराव’ आयोजित केला. सैन्यदलाचे एकूण एक वरिष्ठ अधिकारी हा युद्धसराव बघायला उपस्थित होते. चीन भारतावर आक्रमण करणारच आहे. चिनी सैन्य कशा रीतीने, कोणकोणत्या भूप्रदेशांतून आक्रमण करेल, तिथे आपल्या सैन्याची काय स्थिती आहे, आक्रमक चिनी सैन्याला रोखण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, या सर्व मुद्द्यांचा अतिशय सखोल अभ्यास करून जनरल थोरात आणि यांच्या सहायकांनी हा युद्धसराव म्हणजे युद्धाचे एक प्रकारे प्रात्यक्षिक उभे केले होते. पण संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी ’वॉर माँगरिंग-युद्धखोरपणा’ अशा एका शब्दाच्या फटकार्‍यात जनरल थोरातांच्या सखोल अभ्यासाची फाईल दफ्तरखान्यात फेकून दिली.
 
1961 साली जनरल थिमय्या आणि लेफ्टनंट जनरल थोरात दोघेही निवृत्त होणार होते. जनरल थिमय्यांनी अशी शिफारस केली की, लेफ्टनंट जनरल थोरातांना बढती आणि मुदतवाढ देण्यात येऊन त्यांनाच सरसेनापती करावे. पण पंडित नेहरू आणि कृष्ण मेनन या दोघांनाही हा ’अ‍ॅग्रेसिव्ह मराठा’ (शब्द नीट ध्यानात घ्या) सरसेनापती पदावर नको होता. जनरल थिमय्या आणि लेफ्टनंट जनरल थोरात दोघेही 1961 मध्ये निवृत्त झाले. वेस्टर्न कमांडचे प्रमुख असणारे लेफ्टनंट जनरल प्राणनाथ थापर यांना बढती देऊन सरसेनापती बनवण्यात आले. जनरल थापर एक सैनिक म्हणून चांगलेच होते. पण सेनापती बनण्यासाठी नुसती शिपाईगिरी पुरेशी नसते; माणूस कूटनीतिज्ञ हवा. जनरल थापर साधेे-सरळ व्यक्तिमत्त्व होते. याउलट त्यांचे दुय्यम अधिकारी लेफ्टनंट जनरल ब्रिजमोहन कौल हे रणांगणातल्या कूटनीतीत नव्हे, पण राजकारणातल्या कूटनीतीत चांगलेच पारंगत होते. यामुळे जनरल थापर नाममात्र सेनाप्रमुख आणि नेहरू कुटुंबाशी जवळीक असणारे लेफ्टनंट जनरल कौल हेच खरे सेनाप्रमुख अशी स्थिती झाली.
 
 
neharu to bahadur shastri
 
1962 सालच्या सुरुवातीपासूनच, चीन आक्रमण करणार याची चिन्हे दिसू लागली. तेव्हा ’4थी कोअर’ ही ब्रिटिश भारतीय सैन्यदलातली रद्द केलेली तुकडी घाईघाईने पुन्हा उभारण्यात येऊन जनरल कौल यांना तिचे कमांडिंग ऑफिसर बनवण्यात आले. 20 ऑक्टोबर 1962 या दिवशी चीनने पण ’नेफा’ (आता अरुणाचल प्रदेश) वर आणि पश्चिमेला लदाखच्या अक्साई चीन भागावर एकाच वेळी प्रचंड आक्रमण केले. अतिशय वेगाने पुढे घुसत से ला आणि बोमदि ला या खिंडी आणि तवांग हे महत्त्वाचे ठाणेे जिंकून चिनी सैन्य चौथ्या कोअरचे मुख्यालय असलेल्या तेजपूर या शहराच्या अंगणात येऊन उभे ठाकले. एकदा तेजपूर पडले की, संपूर्ण आसाम प्रांत चीनच्या हातात गेल्यासारखाच होता. अशा निर्वाणीच्या वेळी चौथ्या कोअरचे कमांडर असणारे लेफ्टनंट जनरल ब्रिजमोहन कौल यांनी काय करावे? ते सरळ पहिल्या विमानाने तेजपूरहून दिल्लीला निघून गेले. कारण काय, तर म्हणे, पोट बिघडले. सर्वसाधारण व्यावहारिक भाषेत याला ’पळून जाणे’ असे म्हणतात. पण आपण तसे म्हणायचे नाही हं! कारण जनरल कौल पंडित नेहरूंचे नातेवाईक होते. ’हमारा लाल! जवाहरलाल’ म्हणून ज्या जनतेने ज्या पंडित नेहरूंवर भरभरून प्रेम केले, त्यांचे आवडते जनरल पळून कसे जातील? ते पोट बिघडल्यामुळे दिल्लीला निघून गेले. (कदाचित तेजपूरमध्ये जुलाब थांबवणार्‍या गोळ्या मिळत नसतील.)
 
 
 
मुख्य सेनापतीच असा पळपुटा निघाल्यावर तेजपूरमध्ये एकच गोंधळ उडाला. त्या निकडीच्या प्रसंगी सामान्य नागरिक पुढे सरसावले आणि त्यांनी मिळेल ते शस्त्र हाती घेऊन चिन्यांशी मुकाबला करण्याची तयारी केली. या सामान्य नागरिकांमध्ये मुंबईतल्या गिरगावातल्या, आंग्रेवाडीत राहणारा एक पंचविशीचा तरुणपण होता. त्याचे नाव होते श्रीकांत जोशी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आसाम प्रांत प्रचारक म्हणून नुकतीच त्याने जबाबदारी घेतली होती. पुढे श्रीकांतजी जोशी आजीवन प्रचारक राहिले. सरसंघचालक प. पू. बाळासाहेब देवरस यांचे स्वीय सचिव, हिंदुस्थान समाचारचे प्रमुख संचालक इत्यादी असंख्य कामे त्यांनी सांभाळली.
 
पण चिन्यांनी तेजपूर प्रत्यक्षात ताब्यात घेतलेच नाही. नेफा प्रदेशाचा आणि अक्साई चीनचा त्यांना जेवढा हवा तेवढा भाग, म्हणजे एकूण सुमारे 38 हजार चौ. किमी भाग त्यांनी हिसकावला आणि 29 नोव्हेंबरला एकतर्फी युद्धबंदी केली.
 
 
संताप आणि ताप
 
पराभवाच्या या भयंकर वार्ता ऐकून भारतीय जनतेची मन:स्थिती कशी झाली? कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या एका चित्रपटगीतात मनःस्थितीचे अचूक प्रकटीकरण झाले आहे. ग. दि. मा. लिहितात,
 
’आराम विसरणे आम्ही, आळसा मुळी ना थारा,
 
उत्तरेकडून या इकडे वार्तांसह येतो वारा,
 
ऐकताच का अश्रूंची, डोळ्यात होतसे दाटी,
 
सैनिक हो तुमच्यासाठी...
 
भारतीय नागरिकाचा, घास रोज अडतो ओठी,
 
सैनिक हो तुमच्यासाठी.’
 
’ज्या माणसाला आम्ही ’हमारा लाल, जवाहरलाल’ म्हणून डोक्यावर घेऊन नाचलो, त्याच माणसाच्या चुकीच्या आग्रहांनी आमचा देश रणांगणात केविलवाणा हरला, हे सर्वसामान्य भारतीय माणसाचे दुःख या गाण्यात नेमके प्रकटले आहे.
 
 
दुःखापाठोपाठ संताप आला. फेब्रुवारी 1962ची सार्वजनिक लोकसभा निवडणूक आरामात जिंकलेल्या पंडित नेहरूंच्या सिंहासनाला लोकक्षोभाचे हादरे बसू लागले. मग स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी जनरल कौल, जनरल थापर आणि कृष्ण मेनन यांचे राजीनामे घेऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. लेफ्टनंट जनरल कौल यांच्या जागी कोअर कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल सॅम माणेकशा आले. जनरल थापर यांच्या जागी जनरल जयंतनाथ चौधरी आले. आणि संरक्षणमंत्री म्हणून अखेर पंडित नेहरूंना एका मराठी माणसालाच पाचारण करावे लागले- यशवंत बळवंत चव्हाण!
 
 
यशवंतराव चव्हाण
 
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन होऊन नुकताच म्हणजे मे 1960 मध्ये महाराष्ट्र प्रांत अस्तित्वात आला होता. यशवंतराव चव्हाण हे त्याचे पहिले मुख्यमंत्री बनून फक्त अडीच वर्षे झाली होती. पण पंडित नेहरूंना संरक्षणमंत्री पदावर त्यांच्या विश्वासातला आणि काम करणारा माणूस हवा होता. यामुळे त्यांनी यशवंतरावांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतले.
 

neharu to bahadur shastri 
 
यशवंतराव झपाट्याने कामाला लागले. पराभवामुळे नीतिधैर्य खचलेल्या सेनादलांमध्ये पुन्हा हिंमत निर्माण करणे आणि सेनादलांना अद्ययावत बनवणे, हे त्यांच्यापुढचे महत्त्वाचे मुद्दे होते. चव्हाण साहेबांनी नोव्हेंबर 1962मध्ये संरक्षणमंत्री पदाची शपथ घेतली आणि 1963च्या मार्चमधल्या अर्थसंकल्पात त्यांनी अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांच्याकडून आदल्या वर्षापेक्षा 40 टक्के अधिक रक्कम संरक्षण खात्यासाठी मंजूर करवून घेतली. भारत सरकारने 1951 साली आर्थिक विकासासाठी ’पंचवार्षिक योजना’ आखून ती यशस्वी देखील केली होती. चव्हाण साहेबांनी 1963 साली ’पहिली पंचवार्षिक संरक्षण योजना’ आखून 1964 साली ती लागू देखील केली. या योजने अंतर्गत वायुदलाला सोव्हिएत रशियन सहकार्याने ’मिग’ ही लढाऊ विमाने मिळाली. नौदलाला ’विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका मिळाली. भूदलाला ’विजयंता’ हा रणगाडा मिळाला. एकंदरीतच तीनही सैनिकी दलांचे नूतनीकरण, अद्ययावतीकरण, वेगाने सुरू झाले. साहजिकच सेनादलांचे नीतिधैर्य हळूहळू उंचावू लागले.
 
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रे यशवंतराव चव्हाणांवर तुटून पडायचे. पण यशवंतराव देशाचे संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जाणार म्हटल्यावर आचार्य अत्र्यांच्या अग्रलेखाचा मथळा होता, ’हिमालयाच्या हाकेला सह्याद्री धावला.‘ आणि खरोखरच चव्हाण साहेबांनी सैनिकी दलांमध्ये नवे प्राण ओतून सह्याद्री ही उपमा सार्थ केली.
 
 
पण चीनने 1950 साली तिबेट गिळला तिथपासून 1962 सालापर्यंत आपण चीनबाबत जी काही नीती अवलंबिली, ही फोल ठरली. आपली अहिंसा, प्रेम, जागतिक शांतता, सामंजस्य, साहचर्य, अलिप्त राष्ट्रांचा गट वगैरे सगळ्या गोष्टी अक्षरश: पाण्यावरच्या रेषा ठरल्या नि चिनी आक्रमणाच्या एका जोरदार लाटेने त्यांचा पार धुव्वा उडाला, याचा पंडित नेहरूंना प्रचंड धक्का बसला. चीन बरोबरच्या पराभवाच्या नामुष्कीनंतर अवघ्या दीडच वर्षात 27 मे 1964 रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले.
 
 
9 जून 1964 या दिवशी लालबहादुर शास्त्री नावाच्या अवघी 5 फूट 2 इंच उंची असलेल्या, एखाद्या शाळा मास्तरसारख्या दिसणार्‍या माणसाने पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पंडित नेहरूंचे गर्भश्रीमंतीचे वैभव, आंतरराष्ट्रीय नेतृत्वाची विशाल प्रतिमा, अफाट लोकप्रियता यांच्यापैकी काहीच या नव्या माणसाकडे नव्हते.
 
पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल अयुब खान आणि त्याचा अत्यंत उपद्व्यापी परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो हे बारकाईने हा घटनाक्रम पाहत होते. त्यांनी जाणले की, आता संधी आली आहे अखंड पाकिस्तान बनवण्याची.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव आहेत..