केवळ विवादास्पद-हास्यास्पद बोलतात म्हणून नव्हे तर राजकीय नेता म्हणून ज्यांचे वर्तन देशविरोधी आहे, अशा व्यक्तींना सन्मानाने बोलावण्यामागे या विद्यापीठांचा हेतू नेमका काय असतो याचादेखील शोध घेतला जायला हवा. तर अशा मुलाखतींमधून विद्यापीठीय स्तरावर नेमके काय साधले जाते? सगळे जग ‘वैश्विक खेडे’ म्हणावे इतके जवळ आलेले असताना आणि ज्या विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाते, त्यांना भारताच्या सद्यस्थितीविषयी इतकेही माहीत नसावे? वेड पांघरून पेडगावला जाण्याचे हे उद्योग ही विद्यापीठे का करत आहेत? यामागचे काळेबेरे शोधायला हवे.

घराणेशाहीमुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीची योग्यता, क्षमता न तपासता तिचा राजकारणात सहज प्रवेश होतो; इतकेच नव्हे तर ती व्यक्ती एका महत्त्वाच्या पदावरही विराजमान होते; तेव्हा सर्वात आधी संबंधित पक्षाची हानी होते. एकूणच राजकीय क्षेत्राची गुणवत्ता खालावते...आणि सर्वात जास्त नुकसान देशाचे होते. आपल्या बेजबाबदार, वाह्यात आणि बिनबुडाच्या वक्तव्यांतून राहुल गांधी पुन्हापुन्हा हेच अधोरेखित करत आहेत. त्यांच्यावरच्या या टिप्पणीला पार्श्वभूमी आहे ती, नुकतीच कोलंबिया विद्यापीठात त्यांनी केलेल्या वक्तव्याची. (त्याआधी दोनच दिवस सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भाबडेपणाचा आव आणून ते जे काही बोलले ते तर शिष्टाचारहिनतेचे मासलेवाईक उदाहरण आहे. त्यावर फार वेळ व शब्द खर्ची करण्याची आवश्यकता नाही. त्या वक्तव्याला या पानावर स्थान मिळावे, अशी त्याची योग्यताही नाही.)
मात्र, कोलंबिया विद्यापीठात त्यांनी जे काही वैचारिक, बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आणि त्यांच्या पक्षातील झिलकर्यांनी लगेच त्यांची री ओढली, त्याचा जाहीर निषेध नोंदवायलाच हवा.
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स’ या विभागात ‘फायरसाईड चॅट’ या कार्यक्रमांतर्गत राहुल गांधी यांचा विद्यार्थी-प्राध्यापकांशी मुक्त संवाद योजला होता. त्यावेळी,‘भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ’मेक इन इंडिया’, ’स्टार्ट अप इंडिया’ यांसारख्या सरकारी योजनांतून हाती काही लागले नाही. भारतात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. शिक्षण व्यवस्थेतही गंभीर त्रुटी आहेत,’असे भारताविषयी अतिशय नकारात्मक चित्र त्यांनी उभे केले. या मांडणीला तथ्याचा वा आकडेवारीचा काही आधार नव्हता. भारताची आणि विद्यमान सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलीन करणे, हा एकमेव हेतू त्यामागे होता.
काँग्रेस पक्षाचे खासदार वा नेते म्हणून त्यांनी काय बोलावे, वागण्याबोलण्यातून स्वत:ची किती शोभा करून घ्यावी हा त्यांचा चॉईस आहे; मात्र जेव्हा ते देशाच्या संसदेत विरोधी पक्ष नेता हे अतिशय जबाबदारीचे पद भूषवत असतात, तेव्हा त्यांच्याकडून स्वाभाविक काही अपेक्षा असतात. देशाच्या पंतप्रधानाइतके ज्या पदाचे महत्त्व आहे त्या पदावरून आपण काय बोलतो आहोत, कुठे बोलतो आहोत, याचे भान त्यांनी बाळगलेच पाहिजे. यातून केवळ त्यांचे हसे होत नाही तर त्यांना निवडून देणार्या, त्यांची हुजरेगिरी करण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानणार्यांची बौद्धिक दिवाळखोरी जगजाहीर होते.
‘भारताची आर्थिक स्थिती मजबूत’, ‘जगभरातल्या आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही भारताची वाटचाल विकासपथावरून‘...असे अलीकडेच अनुक्रमे वर्ल्ड बँकेने, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. याबाबतच्या बातम्या आंतरजालावर सहजी उपलब्ध आहेत. त्याची कोणालाही खातरजमा करता येईल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने तर या संदर्भात जगातल्या महत्त्वाच्या अर्थतज्ज्ञांचा एक सर्व्हे केला. त्या सर्वेक्षणात, ‘पुढील बारा महिन्यांत भारताचा विकासदर मजबूत राहील’, असे मत 74% अर्थतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
या तथ्याधारित बातम्या संसदेतील विरोधी पक्षनेत्याच्या गावीही नसाव्यात, असे मानणे अवघड आहे. कोलंबिया विद्यापीठातल्या याच मुलाखतीत भारतातली लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगून त्यांनी निवडणूक आयोगावर, मुख्य निवडणूक आयुक्तांवरही दुगाण्या झाडल्या. इथली निवडणूक यंत्रणा जर सदोष असेल तर अलीकडेच पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन राज्यांत बिगर भाजपा पक्षांची सरकारे कशी निवडून आली, हा साधा प्रश्नदेखील राहुल गांधींना पडला नाही, त्याचेच हे उदाहरण.
केवळ विवादास्पद-हास्यास्पद बोलतात म्हणून नव्हे तर राजकीय नेता म्हणून ज्यांचे वर्तन देशविरोधी आहे, अशा व्यक्तींना सन्मानाने बोलावण्यामागे या विद्यापीठांचा हेतू नेमका काय असतो याचादेखील शोध घेतला जायला हवा. तर अशा मुलाखतींमधून विद्यापीठीय स्तरावर नेमके काय साधले जाते? सगळे जग ‘वैश्विक खेडे’ म्हणावे इतके जवळ आलेले असताना आणि ज्या विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाते, त्यांना भारताच्या सद्यस्थितीविषयी इतकेही माहीत नसावे? वेड पांघरून पेडगावला जाण्याचे हे उद्योग ही विद्यापीठे का करत आहेत? यामागचे काळेबेरे शोधायला हवे. बुद्धिभेदासाठी, दुही माजविण्यासाठी विद्यापीठाइतके हमखास उपयोगी पडणारे दुसरे माध्यम नाही हे उघड गुपित आहे. तेव्हा राहुल गांधींशी कोलंबिया विद्यापीठाचे साटेलोटे आहे का, याचा शोध घ्यायला हवा. हे विद्यापीठ भारतविरोधी हालचालींतला एक मोहरा तर नाही ना, याचा तपास करायला हवा.
अधिवेशन काळात सभागृहात लोकांचे प्रश्न मांडणे, त्याबाबत संसदेत सरकारशी खुली चर्चा करणे हे विरोधी पक्षनेता म्हणून अपेक्षित असते. याचे गांभीर्य ना राहुल गांधींना आहे, ना त्यांच्या पक्षाला. अधिवेशन काळात संसदेत हजर न राहणे, गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज तहकूब करायला भाग पाडणे हीच त्यांना मर्दुमकी वाटते आणि विरोधी पक्षनेता म्हणून इतिकर्तव्यता! असे वागून देशातील करदात्यांच्या पैशांचा आपण चुराडा करतो, वेळेचा अपव्यय करतो, याचाही ना खेद ना खंत!
विचारपूर्वक-अभ्यासपूर्वक, तर्कसुसंगत आणि मुद्देसूद बोलणे...देशप्रश्नांविषयीची कळकळ या पद्धतीने व्यक्त करणे ही त्यांच्याकडून वाजवी अपेक्षा आहे. तिची जेव्हा पूर्तता होताना दिसत नाही, तेव्हा अशा व्यक्तीला पुन्हा विरोधी पक्षनेता पदापर्यंत तरी पोहोचवायचे का, याचा निर्णय या देशातली सूज्ञ, सजग जनता करेल.
पंतप्रधानपद हे तर त्यांच्यासाठी दिवास्वप्नच आहे. फक्त ‘भावी पंतप्रधाना’च्या यादीत आणखी एकाची भर पडेल...कायमसाठी! बिनबुडाच्या टीकेचा हा एककलमी कार्यक्रम त्यांचे वा त्यांच्या पक्षाचे भले करणारा नाही.