जेनसेन हुआंग प्रकरण - धागेदोरे व्हाइट हाउसपर्यंत

विवेक मराठी    21-Nov-2026   
Total Views |
Jensen Huang
 
Nvidia 
अ‍ॅलिस आणि जेनसेन यांनी आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे मान्य केले. पण राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधातील माहिती तिला दिल्याचे त्यांना मान्य नाही. या कथित घोटाळ्यात खुद्द डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकार्‍यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. ट्रम्प यांचाही हुआंग यांची पाठराखण करण्यात किंवा चीनला कमी क्षमतेच्या चिप्स निर्यात करण्यास परवानगी देताना काही हितसंबंध आहेत का हे तपासण्याची मागणी होऊ लागली आहे. या प्रकरणामुळे अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील शीतयुद्धाचे महायुद्धात रुपांतर होताना दिसत आहे. ट्रम्प यांचे व्यक्तिगत हितसंबंध गुंतले असल्याशिवाय असे होणे शक्य नाही असे अभ्यासकांचे मत आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या एनविडिया कंपनीचे प्रमुख जेनसेन हुआंग यांनी राजीनामा देऊन एक आठवडा उलटला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी आपण वैवाहिक जीवनात आपल्या पत्नीशी प्रतारणा केल्याचे मान्य केले. एनविडियामधील आरोग्य विभागात उपाध्यक्ष म्हणून काम करणार्‍या किंबर्ली पावेल तसेच सिंगापूरस्थित मेगास्पीड इंटरनॅशनल या डेटा सेंटर कंपनीच्या अ‍ॅलिस हुआंग या दोन महिलांची नावं त्यांच्याशी जोडली गेली आहेत. अमेरिकेतील गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे की, यापैकी अ‍ॅलिस हुआंग या चिनी गुप्तचर यंत्रणा एमएसएसशी संबंधित आहेत. वरकरणी मेगास्पीड कंपनी मलेशियामध्ये प्रचंड मोठी डेटासेंटर चालवत असून त्याद्वारे आग्नेय आशियातील कंपन्यांना क्लाउड कंप्युटिंगची सेवा पुरवली जाते. ही डेटा सेंटर्स चालवण्यासाठी एनविडियाकडून कंपनीला सुमारे 7.5 अब्ज डॉलर किमतीचे जीपीयु मायक्रोप्रोसेसर किंवा चिप्स देण्यात आल्या असून त्यातील अनेक चिप्सची चीनमध्ये तस्करी करण्यात आली आहे.
 
 -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ 
 
अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकार्‍यांचे मानणे आहे की, आर्टिफिशिअल इंटलिजन्स क्षेत्रात अमेरिकेला चीनच्या पुढे रहायचे असल्यास या क्षेत्राला चालवणार्‍या उच्च क्षमतेच्या चिप्स चीनला मिळता कामा नयेत. अमेरिकेकडे उपलब्ध असलेल्या चिप्सची संख्या चीनपेक्षा सहापट जास्त असली तरी या क्षेत्रात नवनवीन मॉडेल बनवण्यात अमेरिकेची चीनवरील आघाडी अवघी वीस ते पंचवीस टक्क्यांची आहे. चीन या चिप्सची तस्करी करत असून चीनचा वापर अमेरिकेपेक्षा अधिक कार्यक्षम आहे.
 
 
Nvidia
 
एआय उद्योगासाठी अतिशक्तीशाली जीपीयु चिप्सची गरज असते. अशा प्रकारच्या चिप्स गेमिंग संगणकांमध्ये वापरण्यात येतात आणि एनविडिया अनेक वर्षांपासून त्यांची निर्मिती करत असून या क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या चिप्सपैकी सुमारे 90% चिप्स एनविडिया बनवते. त्यामुळे एआय क्षेत्रासोबतच एनविडिया कंपनीची घोडदौड सुरू झाली. चिप जेवढी अधिक शक्तीशाली आणि त्यांची संख्या जेवढी अधिक तेवढी त्या वापरणार्‍या कंपन्यांची संगणन क्षमता वाढते. त्यांची एआय मॉडेल तेवढी अधिक प्रभावी ठरतात. अमेरिकन कंपन्या नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात अन्य देशांपेक्षा किमान एक दशकभराने पुढे असतात. गेल्या काही दशकांमध्ये चिनी कंपन्यांनी उत्पादन क्षेत्रात अमेरिकेला मागे टाकले असून इंटरनेट आणि समाजमाध्यम क्षेत्रातही अमेरिकेला समांतर स्वतःची व्यवस्था उभी केली. चीनची लोकसंख्या 140 कोटींहून अधिक असल्याने तसेच तिथे लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचा अडथळा नसल्याने चिनी कंपन्या या क्षेत्रातही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देऊ लागल्या.
 
एआय क्षेत्रात अमेरिकेच्या आघाडीच्या कंपन्या जसे की, चॅट जीपीटी आणणारी ओपन एआय, जेमिनी आणणारी अल्फाबेट आणि क्लॉड आणणारी अँथ्रॉपिक यांनी संशोधन आणि विकासावर जो खर्च केला त्यापेक्षा फार कमी खर्चामध्ये चिनी कंपन्यांनी डीप सीक आणि किमी आणि क्वेन अशी मॉडेल विकसित केली. चिनी कंपन्या अमेरिकेकडून तंत्रज्ञानाची चोरी करतात. त्यासाठी चिनी गुप्तहेर संस्थांसाठी काम करणार्‍या तरुणांना विद्यार्थी म्हणून अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठात पाठवले जाते. अमेरिकेच्या प्राध्यापकांना आर्थिक आमिषं दाखवून चीनमध्ये बोलावले जाते तसेच चीनबाहेर नोंदणी असलेल्या चीनी कंपन्यांकडून उच्च तंत्रज्ञान मिळवण्याचे प्रयत्न केले जातात. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने एआय क्षेत्रात चीनची घोडदौड रोखायची असेल तर चीनला एनविडिया कंपनीच्या अत्याधुनिक जीपीयु चिप मिळता कामा नयेत अशी व्यवस्था केली.
 
  -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
एनविडियाचे संस्थापक अध्यक्ष जेनसेन हुआंग यांचे वडील 1940च्या दशकात व्यवसायानिमित्त तैवानमध्ये स्थायिक झाले. त्यांची आई तैवानची होती. हुआंग यांचा जन्म तैवानमध्ये झाला. चीनला स्वातंत्र्य मिळत असताना तिथे कॉमिटाँग आणि माओच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षामध्ये गृहयुद्ध झाले. पुढे युद्धविराम होऊन कॉमिटाँगच्या तैवानवर म्हणजे चीनच्या मुख्य भूमीवर कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली. अमेरिकेने 1970च्या दशकापर्यंत माओच्या राजवटीला मान्यता न देता तैवानमधील सरकारलाच चीनचे सरकार म्हणून मान्यता दिली. त्यामुळे तैवान आणि अमेरिका यांच्यात अत्यंत घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. पुढे अमेरिकेने कम्युनिस्ट राजवटीशी राजनयिक संबंध प्रस्थापित करुन त्यांच्या चीनमधील सत्तेला मान्यता दिली असली तरी तैवानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली आहे. धामधुमीच्या या काळात हुआंग यांचे कुटुंबीय थायलंडमध्ये स्थायिक झाले. व्हिएतनाम युद्धाची झळ थायलंडपर्यंत पोहोचल्यानंतर ते अमेरिकेला स्थायिक झाले. जेनसेन हुआंगला शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवले तेव्हा ते अवघे नऊ वर्षांचे होते. पुढे त्यांनी लहानसहान कामं करत ओरेगॉन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. तिथेच त्यांची लोरी मिल्स यांच्याशी भेट झाली. भेटीचे प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात रुपांतर झाले. मिल्स स्वतः इंजिनियर असून त्या हुआंग यांच्याएवढ्याच हुशार आहेत. पण लग्नानंतर मुलांसाठी त्यांनी आपल्या करिअरवर पाणी सोडले. जेनसेन हुआंग 1984 ते 1993 अशी नऊ वर्षं मायक्रोप्रोसेसर क्षेत्रात विविध जबाबदार्‍या हाताळत वयाच्या तिसाव्या वर्षी एलएसआय या कंपनीच्या संचालकपदापर्यंत पोहोचले. 1993 साली त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून एनविडिया कंपनी स्थापन केली. आज एनविडिया जगातील सर्वात जास्त बाजार भांडवल असलेली कंपनी बनली आहे.
 
 
अमेरिका आणि चीनमध्ये मायक्रोप्रोसेसर किंवा चिप युद्ध सुरु असताना चीनची नजर हुआंगवर पडली. अमेरिकेच्या गृहविभागाकडून केलेल्या तपासाचा काही भाग द वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क टाइम्सकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार 2023 साली चीनने सेवनरोड होल्डिंग्स या कंपनीतून डेटा सेंटरची निर्मिती करण्यासाठी मेगास्पीड या नवीन कंपनीची स्थापना करण्यात आली. एनविडियाच्या चिप्सवर आधारित डेटा सेंटर उभी करुन आपल्या ग्राहकांना क्लाउड कंप्युटिंग सेवा उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. या कंपनीची प्रतिनिधी म्हणून चीनने गुप्तहेर म्हणून तयार केलेली अ‍ॅलिस हुआंग तैवानमधील एका व्यापारी परिषदेत जेनसेन हुआंग यांना भेटली. ती 42 वर्षांची असून तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यापूर्वी ती सीसीटीव्ही चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीमध्ये काम करत होती. तेथून तिने वित्त क्षेत्रात आणि तेथून तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केला. असे म्हटले जात आहे की, अ‍ॅलिसचे पती कांग वै यांनीच आपल्या पत्नीची जेनसेन हुआंग यांच्याशी भेट घडवून आणली. वै हे फंड व्यवस्थापक म्हणून काम करतात. आपल्या पत्नीच्या जेनसेन हुआंगशी असलेल्या जवळीकीचा वापर त्यांनी आपल्या व्यवसायवृद्धीसाठी केला. हे सगळे चीनने जेनसेन हुआंग यांच्यासाठी रचलेले जाळे असल्याचा अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना संशय आहे.
 
 
मेगास्पीड ही शेल कंपनी सिंगापूरमध्ये नोंदणीकृत करण्यात आली. असा संशय आहे की, या कंपनीकडून डेटा सेंटरसाठी वापरल्या जाणार्‍या एनविडिया चिप्सपैकी सुमारे 40% चिप्सचा हिशोब लागत नसून त्या चीनला पाठवल्याचा संशय आहे. अतिशक्तीशाली चिप्सच्या साठ्याचा विचार करायचा तर अमेरिका चीनच्या खूप पुढे आहे. असे असताना एआय क्षेत्रामध्ये चीन अमेरिकेशी स्पर्धा कशी काय करू शकतो हा प्रश्न अभ्यासकांना पडतो. चीन स्वतः चिप्स बनवत असला तरी त्यांची क्षमता अमेरिकेच्या आधुनिक चिप्सपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे चीनकडून होणार्‍या तंत्रज्ञान चोरीवर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असते.
 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
 
जून 2024मध्ये अ‍ॅलिस आणि जेनसेन यांना पहिल्यांदा एकत्रित पाहण्यात आले. त्याच वर्षी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने मेगास्पीड कंपनी एनविडियाकडून आधुनिक चिप्स मिळवून त्या चीन सरकारला पुरवत आहे का याचा तपास सुरू केला. मे 2025मध्ये अ‍ॅलिस आणि जेनसेन यांचा तैवानमधील एका खाजगी मेजवानीत पुन्हा एकदा एकत्र असतानाचा फोटो प्रसिद्ध झाला. 9 ऑक्टोबर 2025 रोजी न्यूयॉर्क टाइम्सने मेगास्पीड आणि अ‍ॅलिस हुआंगबद्दल चौकशी सुरू असल्याचे वृत्त सर्वात प्रथम प्रसिद्ध केले. जेनसेन हुआंग अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या उद्योगपतींपैकी एक असल्याने आणि त्यांनी एनविडिया कंपनीचा ट्रम्प सरकारच्या मेक इन अमेरिका धोरणाला उघड उघड पाठिंबा दिला असल्याने या वृत्ताने खळबळ माजली. त्यावेळी कंपनीकडून खुलासा करण्यात आला की, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विविध देशांच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये अनौपचारिक गप्पा रंगतात. त्यात विशेष असे काही नाही. गेल्या आठवड्यात हुआंग यांनी आपण आपल्या पत्नीशी प्रतारणा केली असून अ‍ॅलिस हुआंगशी आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे मान्य केले. पण आपण राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधातील माहिती तिला दिल्याचे त्यांना मान्य नाही. मेगास्पीडनेही आपली कंपनी चीनला चिप्स पाठवत असल्याच्या वृत्ताला नकार देताना खुलासा केला आहे की, आपल्या वागण्यामध्ये पूर्ण पारदर्शकता आहे. थोडक्यात अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांतील चीनविरोधी जहाल गटाचे म्हणणे आहे की, अमेरिकन मायक्रोप्रोसेसर कंपन्यांना चिनी कंपन्यांना आपली उत्पादनं विकण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात यावा. तर मवाळ गटाचे म्हणणे आहे की, असे केल्यास चीन स्वतःच्या चिप्स विकसित करेल. एनविडियाने कमी क्षमतेच्या चिप्स चीनला विकल्यास त्या बदल्यात अमेरिकेला चीनवरील आघाडी टिकवता येईल. अमेरिकेने एनविडिया कंपनीच्या कमी क्षमतेच्या चिप्स चीनला निर्यात कराव्या यासाठी जेनसेन हुआंग आग्रही राहिले आहेत. आता त्यांच्या या भूमिकेकडे संशयाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे.
 
 
 
या कथित घोटाळ्यात खुद्द डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकार्‍यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. एरवी एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात मोठ्या पदावर पोहोचली की, ती व्यक्तिगत उद्योगधंद्यांना तसेच स्वतःच्या आर्थिक हितसंबंधांना दूर ठेवते. अमेरिकेत तर अध्यक्षांनी कसे वागावे याबाबत कठोर नीतीनियम आहेत. साधारणतः अध्यक्ष होणारी व्यक्ती त्यापूर्वी दोन ते तीन दशकं राजकारणात असल्यामुळे ती उघडपणे आर्थिक व्यवहारांमध्ये सहभागी असत नाही. पण ट्रम्प राजकारणात येण्यापूर्वी एक मोठे उद्योजक होते. राजकारणात शिरल्याशिरल्याच ते थेट अमेरिकेचे अध्यक्ष झाल्याने त्यांच्याकडून सावधपणाची अपेक्षा होती. पण ट्रम्प यांनी आपल्या पदाचा उघडपणे आपले आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध जोपासण्यासाठी वापर केला. असे समोर येत आहे की, एनविडियाला कमी क्षमतेच्या चिप्स चीनला निर्यात करण्याची परवानगी देण्यापूर्वी ट्रम्प यांनी कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केले. परवानगी मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअरनी उसळी घेतली असता त्याचा फायदा ट्रम्प आणि त्यांच्या सहकार्‍यांनी करुन घेतला. मुद्दा असा आहे की, जर हुआंग यांच्यावर अमेरिकेच्या विविध गुप्तचर यंत्रणांची 2023पासून नजर होती तर त्यांना अ‍ॅलिस हुआंगबद्दल सावध का करण्यात आले नाही? अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी आणि खुद्द परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी ट्रम्प यांना या प्रकरणाबाबत तपशीलवार माहिती दिली असूनही ट्रम्पनी एनविडियाला चीनला चिप्स विकण्यास परवानगी का दिली? ट्रम्प यांचे व्यक्तिगत हितसंबंध गुंतले असल्याशिवाय असे होणे शक्य नाही असे अभ्यासकांचे मत आहे.
 
 
असे असेल तर मग अमेरिका आपल्या सर्वात यशस्वी आणि महत्त्वाच्या उद्योजकाचा बळीचा बकरा का बनवत आहे हा प्रश्न पडतो.
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण घड्याळाच्या लंबकाप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत आले आहे. अनेकदा ट्रम्पनी आपल्या कुटुंबीयांच्या व्यापारी हितसंबंधांसाठी अमेरिकेच्या धोरणात बदल केल्याचे आरोप केले गेले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचाही हुआंग यांची पाठराखण करण्यात किंवा चीनला कमी क्षमतेच्या चिप्स निर्यात करण्यास परवानगी देताना काही हितसंबंध आहेत का हे तपासण्याची मागणी होऊ लागली आहे. या प्रकरणामुळे अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील शीतयुद्धाचे महायुद्धात रुपांतर होताना दिसत आहे.
 
@ Anay Jogalekar 

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत. इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.