सर्व जगाला भूल घालणार्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात, जागतिक पातळीवर दीर्घकाळ वर्चस्व राखून असलेल्या ’एनव्हिडीया’ या अमेरिकी कंपनीचे संस्थापक जेनसेन हुआंग यांची करण्यात आलेली गच्छंती आणि अवघ्या 12 दिवसांतच सर्व अधिकारपदे बहाल करत, त्यांची झालेली पुनर्नियुक्ती! त्यांच्या जाण्याने जेवढे चर्चांचे वादळ उठले तितकीच चर्चा त्यांच्या पुनरागमनाचीही झाली.
पंधरवड्याच्या आत एकाच विषयासंदर्भात नव्हे तर एकाच व्यक्तीच्या संदर्भात दोन टोकाच्या बातम्या याव्यात, त्या दोन्ही बातम्यांनी जगातल्या राजकीय-आर्थिक क्षेत्राचे लक्ष वेधून घ्यावे, त्याची गांभीर्याने दखल घेत विविध प्रसारमाध्यमांवर आणि समाजमाध्यमांवर त्यावर चर्चा होत रहावी असे घडणे ही बाब आपल्यासाठी नवीन आहे. त्यानिमित्ताने, एखाद्या विषयात लंबकाचे दोन टोकाला जाणे काय असते हे जगाने अनुभवले. ही घटना जागतिक अर्थकारणाची समीकरणे बदलत असल्याची द्योतक तर आहेच; पण त्याचबरोबर राजकीय सत्तेच्या निर्णप्रक्रियेवर बाजारपेठेचा प्रभाव वाढतो आहे, याचीही ती निदर्शक आहे. तसेच, तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी ते शोधून काढणार्या आणि त्याचे उपयोजन करणार्या माणसाचे स्थान अजून तरी त्या तंत्रज्ञानाच्या वरचे आहे हेदेखील त्यानिमित्ताने अधोरेखित झाले. मनुष्याकडे (अद्याप) टिकून असलेल्या श्रेष्ठत्वाची ही जाणीव दिलासा देणारी आहे.
सर्व जगाला भूल घालणार्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात, जागतिक पातळीवर दीर्घकाळ वर्चस्व राखून असलेल्या ’एनव्हिडीया’ या अमेरिकी कंपनीचे संस्थापक जेनसेन हुआंग यांची करण्यात आलेली गच्छंती आणि अवघ्या 12 दिवसांतच सर्व अधिकारपदे बहाल करत, त्यांची झालेली पुनर्नियुक्ती! त्यांच्या जाण्याने जेवढे चर्चांचे वादळ उठले तितकीच चर्चा त्यांच्या पुनरागमनाचीही झाली. संशयित चिनी हेर असलेल्या महिलेशी तसेच कार्यालयातील वरीष्ठ पदावरील स्त्री सहकार्याशी असलेले त्यांचे कथित विवाहबाह्य संबंध याबाबत त्यांनी दिलेल्या कबुलीनंतर त्यांना सर्व पदांवरून पायउतार व्हावे लागले होते. पदच्युत करताना नैतिकतेचा मुद्दा आणि चिनी गुप्तहेराशी असलेल्या संबंधामुळे देशहिताला असलेला धोका हे मुद्दे अग्रस्थानी होते. त्यामुळे टीकाही झाली. ती होणे स्वाभाविकच आहे; मात्र पुनर्नियुक्तीनंतर कार्यालयात आल्यावर त्यांच्या सहकार्यांनी केलेला जल्लोष तसेच या निर्णयाचे इलॉन मस्क, तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आणि सिलिकॉन व्हॅलीतील प्रमुख गुंतवणूकदारांनी केलेले स्वागत हे विशेष लक्षवेधी आहे. जागतिक अर्थकारणाच्या बदलत्या समीकरणाची ती नांदी आहे. एका खाजगी कंपनीच्या संस्थापक तसेच सी.ई.ओ. असलेल्या व्यक्तीच्या प्रकरणात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दाखवलेला रस हादेखील विचार करायला लावणारा आहे.
तसे तर या सर्व प्रकरणाचे विश्लेषण एकरेषीय नाही. अनेक पदर, अनेक आयामांची गुंतागुंत त्याच्यात आहे. दीर्घ लेखाचा विषय असलेल्या प्रकरणाची संपादकीयाच्या माध्यमातूनही दखल घेतली, जावी इतके हे महत्त्वाचे आहे.
एआय हे आजच्या युगाचे तंत्रज्ञान आहे. सगळ्या जगावर त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतो आहे आणि समाजजीवनावर परिणाम करणारी बहुतेक क्षेत्रे त्याच्या वर्चस्वाखाली आहेत. अशा वेळी ‘एनव्हिडीया’ कंपनीचा म्हणजेच पर्यायाने अमेरिकेचा वरचष्मा जगावर रहावा, असे त्या देशाच्या अध्यक्षांना वाटणे स्वाभाविक आहे. या कंपनीने चिनी गुप्तहेराच्या माध्यमातून अब्जावधी डॉलरचे सौदे चिनी कंपन्यांशी केले असण्याचा संशय असल्याने, अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वासाठी ते धोकादायक आहे. ट्रम्प यांनी केलेल्या हस्तक्षेपामागे हे ही कारण आहे; पण त्याचबरोबर, ट्रम्प हे उद्योजक आधी आणि मग राजकारणी आहेत. त्यामुळे केवळ देशहितासाठी त्यांना या विषयात रस आहे असे नाही तर उद्योजक म्हणून त्यांना या प्रकरणातील लाभाच्या संधीही दिसल्या आहेत. हुआंग यांच्या पुनर्नियुक्तीनंतर शेअरमार्केटमध्ये आलेल्या अभूतपूर्व तेजीत ट्रम्प आणि कंपनीने भरपूर पैसे कमावले अशीही चर्चा आहे. याची त्यांच्या राजकीय विरोधकांना केवळ शंकाच नाही तर खात्रीही वाटत असावी. म्हणूनच ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला हे प्रकरण कमी संशयास्पद वाटत असले तरी जे डेमोक्रॅट्सच्या बाजूचे आहेत त्यांच्या मनात संशय आहे. शिवाय जानेवारीपर्यंत रिपब्लिकनचा वरचष्मा असलेल्या संसदेत हुआंग यांची चौकशी होणार आहे. ती किती निष्पक्ष होईल याबाबत विरोधक साशंक आहेत. या संदर्भात हिलरी क्लिंटन यांनी केलेले ट्विट खूप काही सुचवणारे आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे,
''Is it national security scandal? Yes...Is it a corruption scandal? Yes...Is it an insider trading scandal? Yes...Is it a market manipulation scandal? Yes...If it"s "super intelligence',call it Supergate.''
याबरोबरच दुसरा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे तो अर्थकारणाचा. हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर ‘एनव्हिडीया’च्या बाजारमूल्यात झालेली घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब होती. त्याचा शेअरमार्केटवरही विपरीत परिणाम झाला. त्याची गांभीर्याने दखल घेणे कंपनीच्या संचालक मंडळाला भाग होते. हुआंग यांच्या पुनर्नियुक्तीला कंपनीतील कर्मचारी, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी पाठिंबा दिला. पुनर्नियुक्तीच्या मागणीसाठी सुरु झालेल्या ऑनलाईन याचिकेवर 1 लाख 80 हजारांपेक्षा जास्त स्वाक्षर्या आहेत. ही बाबही दुर्लक्षिण्याजोगी नाही.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कामातून या क्षेत्रात हुआंग यांनी मिळवलेले अढळपद. 33 वर्षांपूर्वी त्यांनी केवळ या कंपनीची स्थापनाच केली नाही तर कंपनीची व्यावसायिक रणनीती, तंत्रज्ञानाचा विकास करताना त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि व्यवसायाचा केलेला जागतिक विस्तार, त्यातून अनेक देशातील राजकीय नेत्यांशी व विविध क्षेत्रातील उच्चपदस्थांशी त्यांचे व्यावसायिक स्नेहबंध निर्माण झाले. आज एआयचा जो विविधांगी विस्तार झाला आहे त्यात त्यांच्या एनव्हिडीयाचा वाटा खूप मोठा आहे. त्यातही हुआंग यांचे योगदान मोलाचे आहे. तीन दशकांहून अधिक काळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या, जागतिक पुरवठा साखळी, सरकारी धोरणे याचे सखोल ज्ञान असलेल्या हुआंग यांच्या जागी त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या तोडीची व्यक्ती संचालक मंडळाला शोधता आली नाही हे वास्तवही त्यांची योग्यता, क्षमता यावर प्रकाश टाकणारे आहे.
कंपनीचे बाजारातील स्थान, तिचे आर्थिक मूल्य, तिला लाभलेले नेतृत्व आणि देशासाठी तिचे असलेले महत्त्व या सगळ्या बाबी पुनर्नियुक्तीच्या निर्णयावर प्रभाव टाकणार्या आहेत. त्यातूनच ही घटना घडली आहे. या सगळ्यात नैतिकतेचा मुद्दा मात्र कापरासारखा उडून गेला आहे.
एखादी व्यक्ती एखाद्या उद्योगक्षेत्रासाठीच नाही तर देशासाठी कशी अपरिहार्य होत जाते हे अभ्यासण्यासाठी वर्तमानातले हे सर्वोत्तम उदाहरण आहे. आगामी काळात जागतिक स्तरावर राजसत्तेवर अर्थसत्तेची पकड अधिकाधिक मजबूत होत जाणार, असा इशारा यात आहे.