नवभारताचे मार्गदर्शक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विवेक मराठी    27-Nov-2026   
Total Views |
Dr Babasaheb Ambedkar
भारतात ज्या महापुरुषांनी सार्वभौम आणि राजकीय व्यवस्थांच्या दृष्टीने एक देश बनण्याचे स्वप्न पाहिले, त्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा क्रमांक फार वरचा आहे. घटनात्मक मार्ग, एकसंध राष्ट्र आणि सामाजिक बंधुता यांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भर होता. भाषा, रितीरिवाज, सणवार साजरे करण्याच्या पद्धती आणि अशा असंख्य गोष्टींतून वैविध्य जपून देश टिकवण्याची दूरदृष्टी त्यांनी दिली. सुप्रीम कोर्ट, रिझर्व्ह बँक आणि निवडणूक आयोग यांसारख्या संवैधानिक संस्थांवरील दबाव आणि वाढत्या सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांची गरज तसेच नवभारतासाठी त्यांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित होते.
6 डिसेंबर 1956. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. संपूर्ण देशातील करोडो लोक शोकसागरात बुडाले. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी अतुलनीय लढा उभारणारे एकमेवाद्वितीय नेतृत्व म्हणून बाबासाहेबांची प्रेरणा शतकानुशतके मिळत राहील.
 
1956नंतरच्या कालखंडाचा अभ्यास केला तर या प्रेरणेने भारतीय समाजजीवनाला दिलेली नवीन दिशा, घडवून आणलेली स्थित्यंतरे स्पष्ट दिसून येतात.
 
 
भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा कालानुरूप सुयोग्य उलगडा डॉ. बाबासाहेबांनी केला. भारतीय भूमीतील आणि भारतीय एकत्वाच्या मूल्यांवर आधारित बौद्ध धम्माचा पुन्हा एकदा वेगाने प्रसार आपल्या देशात झाला. सत्तर वर्षांमध्ये आता जगभर हा विचार युगानुकूल स्वरूपात पुढे जाताना दिसत आहे. अशा जागतिक वातावरणांत ‘संयम’ आणि ‘करुणा’ या मूल्यांचा उच्चार होतो. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ ही घोषणा जागतिक शांतीचे प्रतीक बनली आहे.
 
 
आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, हक्कांसाठी सनदशीर किंवा घटनात्मक मार्गांचा आग्रह ही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विशेषता. भारतासारख्या खंडप्राय देशात सामाजिक समस्या मुळापासून संपवण्यासाठी प्रदीर्घ चळवळ आणि लोकप्रबोधन महत्त्वाचे असते. इथे ‘रक्तरंजित क्रांती’ कामी येत नाही, हे सत्य बाबासाहेबांनी खूप आधी ओळखले होते. यानुसार घटनात्मक मार्गांचा आग्रह धरला. त्यामुळे रक्तरंजित क्रांती आणि हिंसेच्या मार्गांनी बदल घडवून आणण्याची इच्छा ठेवणार्‍या राजकीय आणि सामाजिक चळवळींना अपेक्षित असे सशस्त्र उठाव इथल्या पददलित चळवळींनी केले नाहीत. ते प्रबोधनाच्या आणि सनदशीर मार्गांनी जात राहिले. स्वातंत्र्योत्तर भारतात गेल्या सत्तर-पंचाहत्तर वर्षांत हळूहळू अतिडाव्या विचारांच्या हिंसक चळवळी आता नामशेष होताना जेव्हा आपल्याला दिसतात, तेव्हा बाबासाहेबांची देश आणि समाज एकसंध ठेवण्यासाठीची दूरदृष्टी वारंवार अधोरेखित होते.
 
 पुस्तक खरेदी
 
‘राजकीयदृष्ट्या एकसंध भारत’ घडवण्यासाठी डॉ.बाबासाहेबांचे योगदान अतुल्य आहे. राजकीयदृष्ट्या एक देश म्हणजे-राज्यशास्त्रीय भाषेत ‘पॉलिटिकल स्टेट’ (Political state). सध्या आपण ज्या अर्थाने महाराष्ट्र, गुजरात इत्यादी राज्ये म्हणतो ती ‘प्रशासकीय व्यवस्था’ (Administrative states). विशिष्ट भूभाग, लोक, त्यांचे एक केंद्रीय शासन आणि त्यांचे सार्वभौमत्व यांनी युक्त देश म्हणजे राजकीय देश किंवा पॉलिटिकल स्टेट. ‘राजकीयदृष्ट्या एक देश’ असल्याने काय होते? लोकांना अन्य कुणी लादलेली नाही तर आपल्या हिताची राज्यव्यवस्था आणता येते, आपल्याकडे लक्ष न देणारे सरकार घालवता येते. आमच्या संमतीशिवाय तुम्ही आमच्यावर राज्य करू शकत नाही ही राजकीय जागृती येणे (Political Awareness) ही त्या देशाची शासनव्यवस्था बळकट होण्याकडे, लोकहिताचे शासन असण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असते. पूर्वीच्या काळी सत्तांतर व्हायचे तेव्हा रक्तपात व्हायचा. आता लोकशाही पद्धतीने आपल्याला हवे ते, स्थिर आणि बहुसंख्य जनतेची मान्यता असलेले सरकार रक्तपाताविना आणता येते. यामुळे देश प्रगती करतो आणि जगात एक सार्वभौम शक्ती म्हणून प्रकट होतो. ही भावना लोकांमध्ये रूजली की एकत्वाचे अपूर्व प्रकटन होते. देशावर संकट येते त्या त्या वेळी भारतीय जनमानसात उमटणारी एकत्वाची प्रतिक्रिया हे त्याचेच द्योतक आहे.
 
 
भारतात ज्या महापुरुषांनी असे सार्वभौम आणि राजकीय व्यवस्थांच्या दृष्टीने एक देश बनण्याचे स्वप्न पाहिले, त्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा क्रमांक फार वरचा आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी याचे केवळ स्वप्नच पाहिले नाही, तर त्यासाठी लागणार्‍या सर्व व्यवस्था लावण्यासाठी अपार कष्ट घेतले. अन्य कुठल्याही देशात नसेल इतके वैविध्य आपल्या देशात आहे. भाषा, रितीरिवाज, सणवार साजरे करण्याच्या पद्धती, आणि अशा असंख्य गोष्टी. या विविधता टिकवून ठेवत राजकीय भारत एक ठेवणे हे मोठे अवघड काम होते. राजकीयदृष्ट्या एक सार्वभौम, संपन्न आणि सामर्थ्यवान देश बनण्यासाठी मुळात राज्यकर्ते आणि लोक यांना सर्वसमावेशक आणि सर्वमान्य व्यवस्थेने एकत्र जोडणे आवश्यक असते. भारतीय राज्यघटनेच्या रूपाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही अत्यंत आदर्श आणि चोख व्यवस्था आपल्याला दिली आहे. याचवेळी राज्यघटनेच्या तत्त्वांनुसार चालण्याची जबाबदारी सर्व भारतीय नागरिकांची आहे; याचेही भान त्यांनी सर्वांना दिले आहे. म्हणून उद्देशिकेमध्ये ‘आम्ही भारताचे लोक...’ अशी सुरुवात होते आणि ती आम्हाला सार्वभौमतेसाठी ऐक्य आणि बंधुतेच्या मूल्यांची आठवण करून देते.
 
 
Dr Babasaheb Ambedkar
 
”नियोजित राज्यघटना ही जरी दुहेरी राज्यव्यवस्थेची असली तरी, सर्व हिंदुस्थानमध्ये एकच नागरिकत्व आहे. न्यायमंडळ एकसंध आहे. घटनात्मक निर्बंधांसंबंधी जेव्हा मतभेद उत्पन्न होतील तेव्हा त्यावरील अधिकार त्या न्यायमंडळांचाच राहील आणि उपायही ते न्यायमंडळच सुचवेल. दिवाणी निर्बंध किंवा दंडनीय निर्बंध हे सर्व हिंदुस्थानात सारखेच आहेत. अखिल भारतीय पातळीवर नोकरी करणारे अधिकारी समान आहेत. उलटपक्षी अमेरिकन संघराज्याच्या राज्यघटनेप्रमाणे अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व असते. एक नागरिकत्व अमेरिकन संघराज्याचे तर दुसरे वैयक्तिक राज्याचे. तेथे एक संघाचे न्यायमंडळ असते तर दुसरे राज्याचे न्यायमंडळ असते. तेथे संघराज्याचा नोकरवर्ग आणि वैयक्तिक राज्याचा नोकरवर्ग असे दोन वेगळे प्रकार असतात. प्रजासत्ताक राज्यपद्धती स्वीकारल्यावर अमेरिकन संघराज्यातील कोणतेही राज्य आपली स्वतंत्र राज्यघटना करायला मोकळे असते. उलट भारताची राज्यघटना व घटक राज्याची राज्यघटना ही एकच असून तिच्यातून कोणालाही बाहेर पडता येत नाही. राज्यघटनेच्या कक्षेतच दोघांनीही राहिले पाहिजे.”
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(धनंजय कीर लिखित चरित्र, पृष्ठ 456/457)
 
 
या एकाच परिच्छेदातून आपल्याला डॉ.बाबासाहेबांचे समर्थ आणि सार्वभौम भारत घडविण्यातील योगदान दिसून येते. नवीन लोकशाही येथे रुजायची असताना, अनेक सामाजिक आव्हाने असताना राज्यांना अतिरिक्त सार्वभौमत्व दिले तर त्याचे दुष्परिणाम दूरगामी ठरतील हे ओळखून त्यांनी केंद्रीय रचना मजबूत केल्या. एक देश-एक नागरिकत्व ही संकल्पना राबवली. याचबरोबर केंद्रीय व्यवस्था जसे सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक, पोस्ट, रेल्वे, केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था यांना याच दृष्टीने केंद्रीय रचनेत ठेवले. राज्यांना अमर्याद अधिकार दिले नाहीत. अर्थात राज्यांच्या सूचीतील विषय निश्चित करून त्याचे अधिकार राज्यांकडे दिले पण त्यात देखील केंद्राला हस्तक्षेपाचे अधिकार ठेवले. एक सार्वभौम राष्ट्र आणि राज्यव्यवस्था उभारणीसाठी या गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. आज भारत जागतिक पटलावर जे महत्त्व प्राप्त करीत आहे, त्याचा पाया डॉ.बाबासाहेबांनी लावून दिलेल्या या घटनात्मक संरचनांत आहे.
 
 
मात्र सध्या या प्रत्येक संवैधानिक व्यवस्थांवर सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. सुप्रीम कोर्ट, रिझर्व बँक, निवडणूक आयोग यांच्यावरील अलीकडच्या काळातील ‘संघटित हल्ले’ याचे द्योतक आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी या रचनांची यथेच्छ बदनामी करणे ही तर जणू नवी फॅशन बनली आहे. अशा सर्व संवैधानिक व्यवस्थांना राखण्याची जबाबदारी देखील डॉ.बाबासाहेबांनी भारताच्या नागरिकांवर दिलेली आहे; हे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे.
 
 
 
डॉ.बाबासाहेबांच्या नंतर गेल्या सत्तर वर्षांत ‘वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना समान हक्क, दर्जा आणि सामाजिक सन्मान’ ही उद्दिष्टे सर्वच पक्ष आणि संघटना यांच्या प्राधान्यक्रमावर नक्कीच राहिलेली आहेत. मात्र, या उद्दिष्टांसाठी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे अजूनही होत नाही. बाबासाहेबांनी उभारलेल्या लढ्यांनी अभूतपूर्व जागृती केली आहे. पुढे संपूर्ण परिवर्तनासाठी ‘आम्ही भारताचे लोक’ असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन या प्रश्नांशी झुंजणे आवश्यक असते. मात्र दुर्दैवाने सामाजिक न्यायाच्या विषयांना देखील मतपेटीचे-निवडणुकीच्या विषयांपुरतेच मर्यादित ठेवले जात आहे असे चित्र आज दिसते आहे.
 
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी युरोपियन सत्तांनी आपले बस्तान बसवण्यासाठी ज्याची मुद्दामहून सुरुवात केली गेली होती, तो आर्य- द्रविड संघर्ष डॉ. बाबासाहेबांनी मानववंशशास्त्राच्या गंभीर अभ्यासानंतर मुळापासून नाकारला. त्यांचे हे संशोधन देशाच्या अखंडतेला वरदान ठरले आहे. तरीही गेल्या तीस चाळीस वर्षांत हा संघर्ष आणि त्यातूनच मग पुढचा ‘मूळनिवासी आणि आक्रमक’ असा एक मोठा संघर्ष भारतात अत्यंत चलाखीने उभा केला जातो. त्याचे टोक गाठताना ‘भारतातील जातीभेद हे वंशभेद-वर्णद्वेष आहेत’, असे मांडायचे; संयुक्त राष्ट्रसंघाचा हस्तक्षेप मागायचा आणि अंतिमत: देशाचे तुकडे करायचे अशी सगळी प्रयत्नांची साखळी अधूनमधून चालू असते; पण ही साखळी मुळातच तोडता येते याचे कारण बाबासाहेबांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याबद्दल-
I venture to say that there is no country that can rival the Indian Peninsula with respect to the unity of its culture. It has not only a geographic unity, but it has over and above all a deeper and a much more fundamental unity-the indubitable cultural unity that covers the land from end to end. अशा शब्दांत ठामपणे मांडलेला दृष्टीकोन!
 
‘स्वातंत्र्य- समता- बंधुता’ ही तत्त्वत्रयी आपल्याला देताना त्याची मुळे ‘भारतीय’ आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यातही त्यांनी ‘बंधुतेला’ सर्वोच्च स्थान दिले आहे. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी व्यक्तींच्या मनातील इतरांविषयाचा संकुचित भाव पूर्णपणे जायला हवा. त्यासाठी बंधुत्वभाव जागरण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. या विषयात कायद्यांची, निर्बंधांची आवश्यकता तर आहेच; पण त्या सर्वांपेक्षा बंधुभावना महत्त्वाची याला डॉ.बाबासाहेबांनी अधिक महत्त्व दिलेले आहे. सामाजिक न्यायाच्या चळवळींचा सामाजिक बंधुत्वाचा आधार सुटला तर अंतिम लक्ष्यप्राप्ती आणखी दूर जात राहील. गेल्या सत्तर वर्षांत स्वतःला ‘सामाजिक न्यायाला वाहून घेतल्याची’ घोषणा करणार्‍या पक्ष-चळवळींनी सामाजिक बंधुत्व जोपासनेला किती प्राधान्य दिले आहे, याचे आत्मपरीक्षण नक्की करायला हवे!
 
 
डॉ.बाबासाहेबांचे समग्र चिंतन, त्यांनी आपल्याला मिळवून दिलेले घटनात्मक अधिकार, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लावलेल्या व्यवस्था आणि बंधुत्वाच्या आधारेच समता आणि स्वातंत्र्य जोपासण्याची दिलेली शिकवण इथून पुढच्या काळात तर अधिकच मार्गदर्शक असणार आहे. समता आणि बंधुतेवर आधारलेल्या नवभारताच्या शिल्पकारांना-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

डॉ. प्रसन्न पाटील

डॉ. प्रसन्न पाटील हे समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र कार्यवाह
व  देवगिरी विश्व संवाद केंद्र अध्यक्ष आहेत.