प्रथम ‘तुज’ वंदितो महाराष्ट्राचा ‘आत्मनिर्भर’ चित्ररथ

विवेक मराठी    05-Feb-2026   
Total Views |
chitrarath
यंदाच्या प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. कलाक्षेत्रातही महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे हेच यावरून अधोरेखित होते. यावेळेच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना होती, राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाची. भारताचा 77 वा प्रजासत्ताकदिन 26 जानेवारी 2026 रोजी कर्तव्यपथावर भव्य परेडने साजरा करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन आणि अंमलबजावणी रक्षामंत्रालयातर्फे केली जाते. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेर लेयेन व युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अंतोनियो कोस्टा उपस्थित होते. हा सोहळा भारताच्या संविधानाचा स्वीकार आणि सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून झालेल्या स्थापनेचे प्रतीक आहे.
यादिवशी लष्करी सामर्थ्य, विविध राज्यांचे चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात, ज्याद्वारे भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार हे भारताचे सार्वभौमत्व, अस्मिता आणि संस्कृती यांना प्राधान्य देते. विविध राज्यांतील चित्ररथांवर धावती नजर टाकली तरी हे लक्षात येते. यानिमित्त काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या राज्यांची संस्कृती या चित्ररथांच्या माध्यमातून अभिव्यक्त होते. यावर्षी संचालनात 17 राज्ये आणि 13 केंद्र सरकारच्या विभागातील अशा एकूण 30 चित्ररथांचा समावेश होता. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने विशेष लक्ष वेधून घेतले. या भव्यदिव्य चित्ररथाची कलाकृती सादर करणारे चित्ररथतज्ज्ञ असे हरहुन्नरी कलाकार आहेत, तुषार प्रधान, श्रीपाद भोंगाडे, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर.
 
 
महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकाविल्याने उभ्या महाराष्ट्रातील जनतेचा उर अभिमानाने भरून आला आहे. असे असले तरीही सर्वसामान्य जनतेला संपूर्ण समारंभात उणेपुरे 60 सेकंद दिसणार्‍या त्या चित्ररथनिर्मितीमागील कुतूहल असते. याच उत्सुकतेपोटी आपण यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची कलाकृती सादर करणार्‍या तुषार प्रधान यांच्याकडून चित्ररथनिर्मिती ते सादरीकरण या प्रवासाबद्दल विशेष संवाद साधला.
 
 
महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी आपल्याला या चित्ररथ निर्मितीचा बहुमान कसा मिळाला? यावर तुषार यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याचा चित्ररथ सहभागी होणार हे ठरविण्यासाठी केंद्र शासनातर्फे एक समिती गठित केली जाते. या समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, पद्म पुरस्कार विजेते, त्या सोबत रक्षा मंत्रालयातील दिग्गज मंडळी असे 10 ते 12 जण असतात. तसेच प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक विभागाचेही पदाधिकारी समन्वयाची भूमिका बजावतात. ही स्पर्धा खुली असते, म्हणजे एखादं राज्य दुसर्‍या राज्याच्या चित्ररथाची मागणी करू शकते. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागाची निवडप्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आणि सहसंचालक श्रीराम पांडे निवडचाचणीतून राज्यातील सर्वोत्तम रेखाचित्र केंद्र शासनाच्या रक्षा मंत्रालयात सादर करतात. यंदा केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत आणि वंदे मातरम्ची सार्धशताब्दी यावर आधारित वेगवेगळ्या विषयांवर चित्ररथाच्या रेखाचित्रांची मागणी केली होती. आत्मनिर्भर या विषयावर अंतिमत: पाच चित्रांची (पैठणी, गडकिल्ले, जहाजनिर्मितीचे केंद्र, मनोरंजनाची महानगरी-मुंबई, आणि गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक) निवड करण्यात आली. यातून माझ्या ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या रेखाचित्राची निवड झाली, असे तुषार यांनी आनंदाने सांगितले.
 
 
या सादरीकरणासाठी रक्षा मंत्रालयासोबत एकंदर सात बैठका होतात. पहिल्या तीन बैठका डिझाइन संदर्भात, तर चार बैठका त्रिमिती (थ्री डी) मॉडेल, कलाकार, संगीत, सादरीकरणाची रूपरेषा इ. विषयांवर प्रत्यक्ष भेटीत होतात. या चित्ररथाचे सादरीकरण राष्ट्रीय पातळीवरचे असते, त्यामुळे या बैठकांत अनेक महत्त्वाच्या बिंदूवर चर्चा करून संवेदनशील आणि सार्वजनिक स्तरावर वादविवाद होऊ नये, या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.
 

chitrarath 
 
कलाधिपती असलेल्या श्रीगणेश या विषयावरील कलाकृती सादर करायला मिळणे, यापेक्षा कलाकाराचे मोठे भाग्य नाही असं मी मानतो. चित्ररथाच्या माध्यमातूनही महाष्ट्रातील दिग्गज कलाकारांनी हा वारसा जपला आहे, आपण त्यांचे वारसदार आहोत, ही भावना जबाबदारी उत्तम पार पाडण्याचे बळ देत होती. यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय ठरला होता,’गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’. आत्मनिर्भर भारत या मोहिमेला गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशी चालना मिळते, हा संदेश चित्ररथाद्वारे पोचवणे अभिप्रेत होते. गेल्या वर्षी गणेशोत्सवातील एक बातमी वाचली होती,’ Biggest Economic Influencer - Ganesh Festival'. ही बातमीच मला चित्ररथातील गणेशोत्सवातील आत्मनिर्भरतेचे विविध स्रोत (सजावटीसाठी - मखर, फुले, विद्युत रोशणाई, मोदक, मिठाई, मूर्तिकार, ढोलपथक, पर्यटन अशी ही आर्थिक साखळी आहे.) समजण्यास मदतनीस ठरली. आज गणेशोत्सवातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
 
 
गणेशोत्सव हा सण महाराष्ट्राच्या अस्मितेचे, कलेचे संस्कृतीचे आणि धर्मपरंपरेचे प्रतीक आहे. तसेच भक्ती, सामाजिक एकता आणि उत्साहाचे द्योतक आहे. या सर्वांचे प्रतिबिंब चित्ररथात उमटणे आवश्यक होते. हा चित्ररथ महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारा हवा, तेव्हा असा विचार आला की, गणेशोत्सव हा सण सर्वांना जोडणारा आहे. हाच उद्देश घेऊन लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्रेरणा जागवून समाजाची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. हे आपल्या महाराष्ट्राचे संस्कार आहेत. शिवाय कलाक्षेत्रात असलेली महाराष्ट्राची क्षमता आणि व्यापकता यानिमित्त देशाला आणि जगाला घडविण्याची ही मोठी संधी आहे. याच हेतूने महाराष्ट्रातील विविध राज्यांतील दिग्गज कलाकारांचा यात समावेश करण्यात आला.
 
 
तुषार प्रधान सांगत होते की, पहिले रेखाचित्र देण्याआधी नॅशनल जिओग्राफीवरील मेगा फेस्टिवल सिरीज पाहिली, राज्यातील विविध जिल्ह्यांत साजरे होणारे गणेशोत्सवाचे व्हिडिओ पाहिले. मूर्तिकार हा गणेशोत्सवाच्या आत्मनिर्भरतेचे प्रमुख केंद्र आहे. वर्षभर गणेशमूर्तीचा व्यवसाय करणारे ‘पेण’ हे गाव मला आत्मनिर्भरतेचे हब वाटले. कोकणातील गणेशोत्सवाची अजूनही टिकून असलेली पारंपरिकता, विदर्भातील जल्लोष, गणेशोत्सवातील आनंद द्विगुणित करणारे नाशिक व पुणे येथील ढोलपथके, गणपतीचे आवडते नैवेद्य असलेले मोदक या सर्वांची सांगड घालायची होती.
 

chitrarath 
 
गणेशोत्सवाची संस्कृती आणि या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची वाटचाल आम्हाला 12x6च्या मर्यादेत शिल्पाचं गणित बसवण सहजशक्य नव्हतं. त्यासाठी अनुभवाचा, कल्पनाशक्तीचा तांत्रिक बाबींच्या अभ्यासाचा कस लागला. दिल्लीत उड्डाणपूल आहेत, याचाही विचार करून चित्ररथाची मर्यादा 14 फुटाची ठेवावी लागते. कलात्मकतेसोबत प्रेक्षकांवर प्रभाव पाडणारी कलाकृती घडायला हवी याकडे त्याचवेळी लक्ष दिले गेले.
 
 
चित्ररथाचे काम नागपूर आणि दिल्लीत एकाच वेळी चालू होते. योजना, आयोजन, दिग्दर्शन आणि अंमलबजावणी या चतुःसूत्रीवर काम चालू होते. या चित्ररथात एकूण 16 शिल्पं, मुख्य प्रदर्शनीची 3, मंदिराचे शिल्प हे सर्व 26दिवसांत पूर्ण करायचे होते. नागपूरमध्ये आम्हा चार मित्रांची ग्रे प्रॉडक्शन नावाची व्यावसायिक कंपनी आहे. त्यात श्रीपाद भोंगाडे, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर आणि स्वतः मी असे चार जण आहोत. या कंपनीत आमच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयातील बॅचच्या मुली, तसेच महाविद्यालयामधील इन्टर्न विद्यार्थी कामाची धुरा सांभाळतात.
 
 
ग्रे प्रोडक्शनतर्फे होणार्‍या कामाची माहिती देत असताना तुषार सांगत होते की, रसिकाने एखादी कल्पना करावी आणि ते सत्यात साकारण्याचं काम ग्रे प्रोडक्शनने करावं. यात प्रामुख्याने डिझाइन आणि प्रॉडक्शन असे दोन मुख्य विभाग आहेत. चित्रपट आणि नाटक यांचे सेट, मॉलमधील चित्रशिल्पकृती, इव्हेंटचे सेट, नितीनजी गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टमधील म्युझिकल फॉऊंटन येथील 60 शिल्प, मुंबई-नागपूर मेट्रोच्या पीलर्स व उड्डाणपूलांवरील 100 शिल्पांचा प्रोजेक्ट नुकताच आम्ही पूर्ण केला.
 

chitrarath 
 
चित्ररथातील मुख्य दर्शनी भागावरील शिल्प हे महिला सशक्तीकरणाचा आशय स्पष्ट करणारे होते. हे शिल्प यवतमाळमधील पाटणबोरी येथील ज्येष्ठ मूर्तिकार यशवंत येंगूर्तीवार यांनी साकारले. या चित्ररथात कोकणातील व्यक्तीने डोक्यावर घेतलेली गणेशमूर्ती ही मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांची आहे. (
विशाल शिंदे - मूर्तीत प्राण फुंकणारा कलाकार
https://www.evivek.com//Encyc/2025/8/25/article-on-ganesh-idol-making-murtikar-vishal-shinde-.html
) चित्ररथाच्या मागील बाजूस दाखवलेले हेमाडपंती शैलीच्या वर्तुळाकार मंदिरात अष्टविनायकाचे दर्शन घेत असलेले दांपत्य महाराष्ट्र पर्यटनाचा संदेश देणारे आहे. मूर्तिकार हा गणेशोत्सवातील आत्मनिर्भरतेचे प्रमुख केंद्र आहे, तेव्हा चित्ररथात प्रत्यक्ष मूर्तीवर रंगकाम करणार्‍या मूर्तिकाराची भूमिका स्वतः तुषार प्रधान यांनी वठवली. चित्ररथाच्या सादरीकरणात जे संगीत दिले गेले ते महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांचे होते. आमच्या प्रॉडक्शन टीममध्ये महिला कलाकारांचाही मुख्यत्वे समावेश आहे. या चित्ररथाच्या प्रक्रियेत सहा विभागांतून काम चालू होते. रंगकाम-भावना डोंगरे आणि कृष्णा सलवटकर, स्ट्रक्चर फांऊडेशन - देवांश अहुजा आणि मनीष वरेठिया या पर्यवेक्षकांसहित रोशन इंगोळे, सौंदर्यीकरण व वेशभूषा - सपना दहीकर, उर्वशी देकाटे आणि ज्युली बारे यांच्यासहित श्रीपाद भोंगाडे, फायबर वर्क - कृष्णा सलवटकर यांनी या विभागांची जबाबदारी घेतली. दिल्लीत जेव्हा जेव्हा बैठकीसाठी जाणे व्हायचे तेव्हा तेथील कामाची पाहणीही तुषार स्वतः करत होते.
 
 
महाराष्ट्राच्या चित्ररथाचे हे शिवधनुष्य पेलले गेले, ते या सर्वांच्या साथीने. याशिवाय आपल्या महाराष्ट्राची टीम एवढी सक्षम आहे की, यंदा मध्यप्रदेशचा चित्ररथ तयार केला तसेच केंद्र शासनाच्या विभागातील झारखंडचा चित्ररथ शुभ अ‍ॅडस् प्रा. लि.च्या जोडीने तयार केला, असे अभिमानाने तुषार प्रधान यांनी सांगितले.
 
 
या वर्षीचं नियोजन आणि कलाकारांच्या कामाची गती खूप चांगली होती. त्यामुळे नागपूरला झालेलं काम आम्ही 3 जानेवारीपर्यंत दिल्लीत पाठवू शकलो. हे गणरायाच्या आशीर्वादामुळे शक्य झाले, भक्तिभाव असला की देवही भेटतो, याची प्रचितीदेखील यानिमित्ताने आली. झाले असे की, 23 जानेवारीला पहिल्या ट्रायलसाठी चित्ररथ निघणार होते, म्हणून 22 जानेवारीला चित्ररथ संपूर्णपणे तयार हवा होता. त्यासाठी गणपती चित्ररथावर विराजमान करण्यात आले आणि तो दिवस होता माघी चतुर्थीचा, म्हणजेच गणेशजन्माचा. त्यानंतर पूजा, आरती याने सारे वातावरण भारावून गेले होते. कर्म करत रहा पण फळाची अपेक्षा ठेवू नका हा आपला संस्कार, त्याचप्रमाणे काम झाले आणि माघी गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशीच आम्हाला निःस्वार्थ कामाचे फळ म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही प्राप्त झाले. हा आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे, असे अभिमानाने तुषार प्रधान यांनी सांगितले. प्रयत्नांती परमेश्वर... ही म्हणच यातून साकार झाली आहे.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.