वराहावतारमूर्ती श्रीविष्णू, राजसत्ता आणि पृथ्वीचा उद्धार

विवेक मराठी    06-Feb-2026   
Total Views |
 
 
varaha
आज आपण दोन वेगवेगळ्या वराहमूर्ती समजून घेणार आहोत. या दोन्ही मध्यप्रदेश राज्यामधल्याच आहेत. पहिली आहे ती उदयगिरीच्या गुंफांमधली नृवराह मूर्ती तर दुसरी मूर्ती आहे ऐरण येथील भूवराह मूर्ती. दोन्ही मूर्तींमध्ये काळाच्या दृष्टीने पाहिले तर सुमारे शंभर वर्षांचे अंतर आहे, पण कलेच्या दृष्टीने पाहिले तर दोन्ही मूर्तींची घडण अगदी वेगळी आहे.
श्रीविष्णूच्या दशावतारांमध्ये वराहावतार हा तिसरा अवतार मानला जातो. पण भारतीय मूर्तिशास्त्राच्या इतिहासात हा अवतार केवळ एक भक्तिरसपूर्ण पौराणिक कथा नसून राजसत्ता, धर्मसत्ता आणि भौगोलिक राज्यविस्ताराचे दृश्य रूप ठरतो. पुराणकथेनुसार जय व विजय ह्या श्रीविष्णूच्या द्वारपालांना शाप दिलेला असतो की, त्यांचा जन्म राक्षसकुळात होईल आणि श्रीविष्णूच्या हस्ते त्यांचा वध झाला तरच त्यांना मोक्ष मिळेल. त्याप्रमाणे जय व विजय हे कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी दिती ह्यांच्या पोटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू ह्या नावाने जन्म घेतात. हिरण्याक्ष कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवतो की, कुठलाही प्राणी किंवा मनुष्य त्याचा वध करू शकणार नाही. त्या वराच्या सामर्थ्याने उन्मत्त होऊन मग हिरण्याक्ष पृथ्वीला म्हणजेच भूदेवीला पळवून एकार्णवात म्हणजे आदिम समुद्रात लपवून ठेवतो. त्यामुळे भयभीत होऊन सर्व देव श्रीविष्णूला साकडे घालतात. श्रीविष्णू मग वराहाचे रूप घेऊन समुद्रात मुसंडी मारून हिरण्याक्षाचा वध करतात व भूदेवीचा उद्धार करतात.
 
 
 
गुप्त राजांच्या काळात वराहोपासना जोरात होती. प्रख्यात मूर्तिशास्त्रज्ञ टी. ए. गोपीनाथ राव आपल्या Elements of Hindu Iconography ह्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे नमूद करतात की, श्रीविष्णूचा वराहावतार ही केवळ पशुमुखी देवप्रतिमा नसून ऋताची (cosmic order) पुनर्स्थापना करणारी तत्त्वमूर्ती आहे. संकटात बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करणारा श्रीविष्णू हे रूपक त्या काळच्या गुप्त राजांना भावले असावे. फ्रेडरिक आशर ह्या गुप्त काळाचा अभ्यास करणार्‍या संशोधकाने असे म्हटले आहे की, गुप्त राजांनी तोपर्यंत राजकीयदृष्ट्या विसकळीत असलेला उत्तर भारत एकसंध केला व आपल्या एकछत्री अंमलाखाली आणला. ज्याप्रमाणे श्रीविष्णूंनी वराहावतार घेऊन असहाय्य पृथ्वीचा उद्धार केला, त्याच प्रमाणे पराक्रमी गुप्त सम्राटांनी राजकीयदृष्ट्या अस्थिर असलेल्या उत्तर भारताचा उद्धार केला. त्या एकीकरणाचे प्रतीक म्हणून ह्या दोन्ही मूर्ती घडवल्या गेल्या असाव्यात.
 
 
 
मध्यप्रदेशातील विदिशाजवळच्या उदयगिरीच्या गुंफांमधील महाकाय नृवराह शिल्प हे गुप्त राजांच्या राजकीय विजयाचे सर्वांत प्रभावी असे दृश्य प्रतीक आहे. कॉमन ईराच्या पाचव्या शतकात कोरले गेलेले हे महाकाय शिल्प भारतात सापडलेल्या प्राचीनतम वराहमूर्तींपैकी एक आहे. उदयगिरीच्या पाच नंबरच्या गुंफेत असलेले हे महाकाय भित्तीशिल्प बघून आपण आजही अवाक होऊन जातो. हा वराह नृवराह आहे, म्हणजे त्याचे शरीर माणसाचे आणि तोंड तेवढे वराहाचे आहे. एक पाय जमिनीवर ठामपणे रोवलेला आणि दुसरा पाय उचलून एका शिळेवर ठेवलेला अशा आवेशपूर्ण आलीढ मुद्रेत श्रीविष्णू उभे आहेत. ही मुद्रा केवळ युद्धाची नाही, तर स्थैर्य आणि नियंत्रणाची आहे.
 
 
 
वराहमूर्तीच्या पोटर्‍या, पाय आणि एकूणच शरीर अत्यंत सौष्ठवपूर्ण आणि प्रमाणबद्ध आहे. त्या काळात मानवी शरीराला प्राण्याचे मुख बसवताना शिल्पकारांना गळ्याचे काय करायचे हे कळले नसावे, कारण ह्या मूर्तीला गळा दिसत नाही. पण भारतातली सिक्सपॅक ऍब्स असलेली ही कदाचित पहिलीच मूर्ती असावी. ह्या महावराहाच्या मस्तकावर मुकुट नाही. श्रीविष्णूच्या शिल्पांकनात पुढे प्रचलित झालेली चिन्हे म्हणजे शंख, चक्र, आणि गदा ही देखील ह्या शिल्पात दिसत नाहीत. मूर्ती द्विभुज आहे. मूर्तीच्या अंगावर आभूषणेही फारशी नाहीत. गुढघ्यापर्यंत येणारी भरगच्च वैजयंतीमाला तेवढी दिसते. श्रीविष्णूंनी कमरेभोवती गुढग्यापर्यंत येणारे तंग धोतर नेसले आहे. कमरेला कलात्मकरित्या कसलेला शेला आहे.
 

varaha murthy 
 
महाकाय अशा महावराहाच्या खांद्यावर भूदेवी आरूढ आहे. तिचे मस्तक आता तुटलेले आहे पण वराहमूर्तीच्या प्रचंड आकारापुढे भूदेवी किती नाजूक दिसते बघा. भूदेवीची मूर्तीही साधी आणि अनलंकृत आहे. मागे भिंतीवर गोलाकार कमलपुष्प उगवलेले आहे. वराहाच्या पायाशी हात जोडून नागदेवता बसली आहे, एकार्णव समुद्राचे प्रतीक म्हणून. मागे भिंतीवर हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे आनंदी दिसणारे ऋषी-मुनी हात बांधून उभे आहेत. गुहेची पूर्ण एक भिंत व्यापणार्‍या ह्या शिल्पपट्टात अनेक उपप्रतिमा असूनही संपूर्ण शिल्प कुठेही विसकळीत वाटत नाही, ही गुप्तकाळातील शिल्पकलेची परमावधी आहे. महावराहाच्या खांद्यावर बसलेली भूदेवी अत्यंत नाजूक कोरलेली आहे, हा अपघात नसून हा विरोधाभास जाणूनबुजून रचलेला आहे. स्टेला क्रॅमरिश आपल्या The Hindu Temple ह्या ग्रंथात आवर्जून नमूद करतात की, विष्णूच्या वराह अवतारामध्ये श्रीविष्णू हे तारक शक्ती म्हणून कल्पिले आहेत, तर पृथ्वी ही नाजूक आणि श्रीविष्णूच्या संरक्षणावर टिकणारी अशी दर्शवली जाते. ह्या शिल्पामधल्या वराहाच्या बलदंड देहासमोर भूदेवीचे सौम्य, नाजूक, फुलासारखे अस्तित्व हीच गोष्ट अधोरेखित करते.
 
 
उदयगिरीच्या पाचव्या गुंफेतील ही महावराहमूर्ती भारतीय मूर्तिशास्त्राच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा मानली जाते. गुप्त राजवंशाच्या उत्कर्षकाळात कोरलेली ही मूर्ती म्हणजे वराहावताराचे सर्वांत आरंभीचे, तरीही पूर्ण विकसित असे भित्तीशिल्पीय रूप आहे. येथे विष्णू हा पूर्णपणे मानवही नाही आणि पूर्णपणे पशूही नाही-तो नृवराह आहे. हा संक्रमणाचा क्षणच या मूर्तीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. उदयगिरीचा हा महावराह म्हणजे केवळ एक पुराणकथानिर्मित मूर्ती नाही. तो गुप्तकाळातील राजसत्ता, विश्वनियम आणि धार्मिक कल्पनांचा संगम आहे-जिथे देव केवळ पूज्य नसून तारक आहे.
 
 
उदयगिरीनंतर वराह प्रतिमेचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मध्यप्रदेशातील ऐरण येथील भूवराहमूर्ती. उदयगिरी गुंफांनंतर साधारण एका शतकाने म्हणजे सहाव्या शतकात कोरलेली ही मूर्ती उदयगिरीच्या वराहाशी नाते सांगते, पण त्याच वेळी मूर्तिशास्त्रातील पुढचा टप्पाही स्पष्ट करते. ऐरणचा वराह पूर्ण पशुरूप असा चतुष्पाद भूवराह आहे, नृवराह नव्हे. म्हणजेच येथे मानवी देह आणि पशुमुख यांचे संमिश्रण संपून, वराहाचे स्वतंत्र दैवी रूप प्रस्थापित झालेले आहे.
 

varaha murthy 
 
टी. ए. गोपीनाथ राव या बदलाकडे लक्ष वेधताना सांगतात की, आरंभी वराहावताराची कल्पना ही पशूचे मुख आणि मानवी देह असलेल्या रूपात केली जात होती, परंतु पुढील प्रतिमाशास्त्रीय विकासात वराहाचे संपूर्ण पशुरूप हेच स्वतंत्र व पूर्ण दैवी रूप म्हणून स्वीकारले गेले आहे. लाल वालुकाश्माच्या एकाच अखंड शिळेतून ही मूर्ती कोरलेली आहे आणि तिची उंची सुमारे 11 फूट इतकी आहे. मूर्तीच्या खांद्यावर छोटे मंदिर कोरलेले आहे आणि संपूर्ण अंगावर ऋषी कोरलेले आहेत. छोटीशी नाजूक भूदेवी वराहाच्या उजव्या सुळ्यावर लटकलेली आहे.
 
 
उदयगिरीच्या वराहमूर्तीवर नसलेली श्रीविष्णूची लांछने ऐरणच्या भूवराहमूर्तीवर स्पष्टपणे दिसून येतात. देहावर अलंकार वाढतात, प्रतिमा अधिक दैवी होते. या दोन वराहमूर्तींमधील फरक आपल्याला गुप्तकाळात मूर्तिशास्त्र कसे अधिक निश्चित, नियमबद्ध आणि धर्मशास्त्रीय बनत गेले हे स्पष्टपणे दाखवतो. वराह प्रतिमेचा वापर पुढे केवळ मंदिरशिल्पांपुरता मर्यादित राहिला नाही. गुप्तोत्तर काळात वराह हा राजसत्तेचा प्रतीकात्मक अवतार बनला. पृथ्वीचा उद्धार करणारा देव म्हणजे राज्य टिकवणारा, संकटातून प्रजा वाचवणारा राजा ही प्रतिमा गुप्त काळानंतरच्याही राजवटींना भावली म्हणून त्यांनी वराह हे चिन्ह आपल्या राजमुद्रेवर आणि नाण्यांवरही वापरायला सुरवात केली. दक्षिणेत चालुक्य राजांनी पहिल्यांदा वराहचिन्ह असलेली नाणी पाडली. पुढे राष्ट्रकूट, कदंब, होयसळ आणि विशेषतः विजयनगर साम्राज्याने वराहाला राजचिन्ह म्हणून स्वीकारले. कृष्णदेवरायाच्या काळात तर वराह ही राज्यसंरक्षणाची अधिकृत प्रतिमा बनली. ह्या संक्रमणांवर भाष्य करताना नि. पु. जोशी स्पष्ट करतात की, गुप्तोत्तर काळात वराह ही प्रतिमा केवळ देव न राहता धर्माधिष्ठित सत्तेचा नैतिक आधार बनली. हिंदू राजे स्वत:ला पृथ्वीवरील विष्णूचे प्रतिनिधी मानू लागतो, ज्यांचे कर्तव्य होते पृथ्वीचे आणि प्रजेचे रक्षण करणे, पोषण करणे, अव्यवस्था रोखणे आणि धर्म टिकवणे.
 
 
या संदर्भात ह्या दोन्ही वराहमूर्तींचा अभ्यास अर्थपूर्ण ठरतो. इथे वराह फक्त पुराणकथेला देव नाही तर तो एकछत्री राज्यसंकल्पनेचा आद्य शिल्परूप अवतार आहे. ह्या दोन्ही मूर्ती बघताना त्या मूर्ती कोरणार्‍या शिल्पकारांची प्रतिभा आज इतकी शतके लोटली तरी आपले डोळे दिपवते. इतक्या महाकाय दोन्ही मूर्ती असूनदेखील त्या कुठेही बेढब किंवा तोल सुटलेल्या वाटत नाहीत. दोन्ही वराहमूर्तींचा तो महाकाय आकार, आवेश आणि खांद्या बसलेल्या भूदेवीचे नाजूक सौंदर्य एकमेकांना पूरक असेच आहे. आज ह्या दोन्हीकडच्या वराहमूर्ती फार दुर्लक्षित अवस्थेत आहेत, पण गुप्त काळात ह्या मूर्ती कशा दिसत असतील आणि त्या बघायला येणार्‍या भाविकांची मने ही विशाल शिल्पे पाहून कशी भारावून जात असतील, ह्याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो.
 
 
गुप्तोत्तर काळात वराह हा राजसत्तेचा प्रतीकात्मक अवतार बनला. पृथ्वीचा उद्धार करणारा देव म्हणजे राज्य टिकवणारा, संकटातून प्रजा वाचवणारा राजा ही प्रतिमा गुप्त काळानंतरच्याही राजवटींना भावली म्हणून त्यांनी वराह हे चिन्ह आपल्या राजमुद्रेवर आणि नाण्यांवरही वापरायला सुरवात केली. दक्षिणेत चालुक्य राजांनी पहिल्यांदा वराहचिन्ह असलेली नाणी पाडली. पुढे राष्ट्रकूट, कदंब, होयसळ आणि विशेषतः विजयनगर साम्राज्याने वराहाला राजचिन्ह म्हणून स्वीकारले. कृष्णदेवरायाच्या काळात तर वराह ही राज्यसंरक्षणाची अधिकृत प्रतिमा बनली.

शेफाली वैद्य

शेफाली वैद्य या एक लेखिका, सोशल मीडिया प्रभावक आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाष्यकार आहेत, ज्या राजकारण, संस्कृती आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडतात; त्या विशेषतः '#NoBindiNoBusiness' मोहिमेसाठी ओळखल्या जातात आणि त्यांनी विविध माध्यमांवर लेखन केले आहे, तसेच त्या हिंदू स्थापत्यशास्त्र आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक म्हणूनही ओळखल्या जातात.