थेंबे थेंबे तळे साचे...

विवेक मराठी    07-Feb-2026   
Total Views |
भारताचा बचत दर सातत्याने 30 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. संसाधने जपून वापरणे, जमेल तशी बचत करणे हा भारतीय समाजाचा स्वभाव राहिला आहे. देशभरातील भाषांत असलेल्या या म्हणी त्याचीच साक्ष देत आहेत. वरकरणी भूप्रदेश वेगळा, त्यामुळे येणारी वेगवेगळी वेशभूषा, त्या त्या प्रदेशात विकसित झालेल्या भाषा वेगवेगळ्या, बरेचदा त्यांच्या लिप्याही निराळ्या. एकमेकांत शेकडो वा हजारो मैलांचे अंतर. असे असूनही या भाषांतल्या म्हणींच्या मध्ये इतका कमालीचा सारखेपणा आहे हे चकित करणारे आहे.

Union Budget 2026
 
नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प मांडला गेला. आता महिनाभर त्यावर सर्व बाजूंनी चर्चा होत राहील. देशाच्या अर्थमंत्री असोत नाहीतर घर चालवणारी महिला असो, आहेत त्या पैशात सर्व गरजांची पूर्तता करणे हे मोठे कौशल्याचे काम असते. हे करत असताना पैशाचा अपव्यय टाळणे, जेव्हा पैसा येईल तेव्हा तो थोडा थोडा जपून ठेवणे हे कामही गृहिणींना करावे लागते. असे थोडे थोडे करत धनसंचय करणे अशा अर्थी मराठीत नेहमी वापरली जाणारी म्हण शीर्षकातच लिहिली आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे‘ ही म्हण गेली कितीतरी शतके मराठी लोकांच्या बोलण्यात चालत आली आहे. गंमत म्हणजे नियमितपणे गुंतवणूक करण्याची सध्याची रूढ पद्धत म्हणजे एस.आय.पी किंवा पद्धतशीर गुंतवणूक पद्धती. असा एस.आय.पी.चा सल्ला देणारे देखील याच म्हणीला व्यावहारिक रूप देत असतात. याच अर्थाची अर्धी अर्धीने रुपया होतो अशीही एक म्हण मराठीत आहे.
 
 
हाच अर्थ सांगणारी हिंदी म्हण आहे, ‘धन बचा के धन सैती‘. याचाही अर्थ असाच आहे की, ‘कण कण मिळून धनसंचय‘ होतो किंवा ‘कौडी कौडी करया लंक लागै‘ या हिंदी म्हणीचाही तोच अर्थ आहे आणि अजूनही अनेक म्हणी हिंदीत रूढ आहेत. पंजाबी भाषेत कौडी कौडी वाचवून होतात लाख-कोटी अशा अर्थाची म्हण आहे किंवा धागा धागा एकत्र येऊनच तर तागा होऊ शकणार असेही सांगणारी एक म्हण आहे. काश्मिरी भाषेत ‘फांद्या फांद्या एकत्र करूनच त्याचा डोंगर होणार‘ असे एका म्हणीत सांगितले आहे. बहुदा काश्मीरचा भाग अधिक वनसंपदा असणारा असल्यामुळे म्हणीतही त्याचे प्रतिबिंब पडले असेल. सिंधी भाषेत शीर्षकात लिहिलेलाच आशय थेंब थेंब साठवूनच तळे भरणार आहे या अर्थाच्या म्हणीत सांगितला आहे. गुजरातीमध्ये ‘दगड दगड मिळून बांध बनतो‘ आणि थेंब थेंब मिळून तळे बनते अशी म्हण आहे. ‘बंगाली भाषेत बिंदू बिंदू मिळून होते वृष्टी आणि तळ्यामध्ये साकारते सृष्टी‘ अशी पूर्ण चित्र-वर्णन करणारी म्हण आहे. असमिया भाषेत सर्वांनी एकत्र आपली ओली नखे झटकली तरी नदी वाहील अशी कमालीची अतिशयोक्ती करणारी एक म्हण आहे.
 
 
दक्षिणेकडील भाषांपैकी तमिळमध्ये थेंब थेंब मिळून पूर येईल अशी म्हण आहेच, शिवाय वेळोवेळी एकत्र केलेला पैसा पैसा मिळून हजार होतील असा बचतीचा मंत्र सांगणारी म्हणही आहे. तेलुगु भाषेत ‘चिल्लर चिल्लर मिळूनच लक्ष्मी मिळेल‘ असे सांगितले आहे. मल्याळम भाषेतही थेंब थेंब मिळून महासागर बनेल असे सांगणारी म्हण आहे आणि कन्नड मध्ये ‘थेंब थेंब मिळून तळे भरेल आणि दाणा दाणा मिळूनच ढीग बनेल‘ या म्हणीत बचतीचे महत्त्वच सांगितले आहे.
 
 
असे म्हणतात की, भारताचा बचत दर सातत्याने 30 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. संसाधने जपून वापरणे, जमेल तशी बचत करणे हा भारतीय समाजाचा स्वभाव राहिला आहे. देशभरातील भाषांत असलेल्या या म्हणी त्याचीच साक्ष देत आहेत. वरकरणी भूप्रदेश वेगळा, त्यामुळे येणारी वेगवेगळी वेशभूषा, त्या त्या प्रदेशात विकसित झालेल्या भाषा वेगवेगळ्या, बरेचदा त्यांच्या लिप्याही निराळ्या. एकमेकांत शेकडो वा हजारो मैलांचे अंतर. असे असूनही या भाषांतल्या म्हणींच्या मध्ये इतका कमालीचा सारखेपणा आहे हे चकित करणारे आहे. ही एकात्मता देखील एका दिवशी साध्य झालेली नाही. सर्व भारतीयांनी एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून हजारो वर्षात हे ऐक्यही कणाकणाने साध्य केले आहे. क्षुल्लक वादात भाषा-भाषात वैमनस्य निर्माण न होता हे ऐक्य असेच कणाकणाने वृद्धिंगत करणे आपले सगळ्यांचेच काम आहे.
वेगवेगळ्या भाषांमधला भगिनीभाव दाखवणार्‍या म्हणी तुम्हालाही ठाऊक असतील तर अर्थासह नक्की कळवा. आपल्या लेखमालेत त्यांचा जरूर अंतर्भाव करू.
संपर्क - साप्ताहिक विवेक (फक्त SMS / व्हॉटसपसाठी) 9594962304

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक