एका हाताने टाळी वाजत नाही...

विवेक मराठी    14-Mar-2026   
Total Views |

tali
संपूर्ण भारतात ही म्हण आहे तशीच आहे, फक्त दोन राज्यातल्या म्हणीत तुंबखनार आणि झांझ अशा दोन वाद्यांचा उल्लेख आहे. गंमत म्हणजे तुंबखनार या तालवाद्याचा उल्लेख काश्मीरी भाषेत तर झांझ या घनवाद्याचा उल्लेख असमियामध्ये आला आहे. ही दोनही राज्य सुदूर सीमावर्ती राज्ये आहेत. एक उत्तरेकडील तर दुसरे पूर्वेकडील. तसे बघितले तर, मधल्या उरलेल्या भारताच्या विस्तीर्ण प्रदेशात आणि तिथल्या लोक-परंपरेत विविध तालवाद्य आणि विविध घनवाद्य रुळलेली आहेत. मृदंग, झांझ, टाळ ही तर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेत लोकप्रिय वाद्ये आहेत.
सध्या मध्यपूर्वेत युद्ध पेटले आहे. युद्धाबद्दल प्रतिक्रिया देताना काही लोक एका बाजूवर अन्याय होत असल्याचे सांगत आहेत तर विचारपूर्वक आणि माहितीनिशी व्यक्त होणारे लोक परिस्थितीचे नीट विश्लेषण करून दोन्ही बाजूंकडून काय चुकले, चुकत गेले याची मांडणी करत आहेत. ऐतिहासिक बाबींना विचारात घेत विश्लेषण करत आहेत. हे युद्ध कधी थांबणार याची मांडणी करणारे लोकही कुठल्या पक्षाने काय सोडावे, कुठल्या पक्षाने अमुक बाबतीत ताणून धरू नये, अशा चर्चा माध्यमांत करताना आपण ऐकतो आहोत. पण अशा चर्चांत एक वाक्य नेहमी म्हटले जाते...
 
टाळी एका हाताने वाजत नाही...
 
मराठीत ही म्हण अनेकदा वापरताना आपण ऐकले आहे. दोन भांडणारी भावंडे, शेजारी, गट, पक्ष यांच्यात समझोता करू बघणारा म्हणतो. दोघांनी थोडे नमते घ्या कारण टाळी एका हाताने वाजत नाही. उर्दूत आणि हिंदीतही ‘एक हात से ताली नहीं बजती’ अशी म्हण आहे. हिंदीतही स्थानिक बोलीनुसार राजस्थानपासून बिहारपर्यंत काही भेद आहेत. उदा: ’ताली दोऊ कर बाजे’ किंवा ’एक हाथ सूँ ताली को बाजैं नी’ किंवा ’रोटी दुन्हू हाथ से पकऽए’ वगैरे; पण व्यक्त होणारा अर्थ हाच आहे. पंजाबी भाषेत ’ताडी दो हत्था नाल बजती है’ अशी म्हण आहे. अर्थ हाच की, टाळी दोन हातांनी वाजते. काश्मिरी भाषेत मात्र एका हाताने ‘तुंबखनार वाजत नाही‘ अशी म्हण आहे. ‘तुंबखनार‘ नावाचे एक छोटे तालवाद्य किंवा थापवाद्य आहे. मूळचे मध्य आशियातील वाद्य काश्मीरमध्ये लोकसंगीतात वाजवले जाते. या शिवाय टाळी दोन हातांनी वाजते किंवा टिचकी वाजवायला देखील दोन बोटे लागतात अशा दोन म्हणी काश्मिरी भाषेत आहेतच. उत्तरेत बोलली जाणारी आणखी एक भाषा म्हणजे सिंधी. सिंधीतही शीर्षकात लिहिलेली म्हण तशीच्या तशी वापरली जाते.
 
 
बाकी भारताच्या पूर्व, दक्षिण, पश्चिम या भागांतील भाषांत देखील एका हाताने टाळी वाजत नाही ही म्हण अगदी जशीच्या तशी वापरली जाते. अशा भाषा म्हणजे गुजराती, बंगाली, उडिया, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम. आसामच्या असमिया भाषेत मात्र एका हाताने झांझ वाजत नाही असे सांगणारी म्हण आहे तर तमिळ आणि मल्याळम भाषांत एका बोटाने टिचकी वाजणार नाही अशीही म्हण आहे.
 
 
वरील सगळ्या म्हणी बघितल्या तर असे लक्षात येते की, फक्त दोन राज्यातल्या म्हणीत तुंबखनार आणि झांझ अशा दोन वाद्यांचा उल्लेख आहे. गंमत म्हणजे तुंबखनार या तालवाद्याचा उल्लेख काश्मीरी भाषेत तर झांझ या घनवाद्याचा उल्लेख असमियामध्ये आला आहे. ही दोनही राज्य सुदूर सीमावर्ती राज्ये आहेत. एक उत्तरेकडील तर दुसरे पूर्वेकडील. तसे बघितले तर, मधल्या उरलेल्या भारताच्या विस्तीर्ण प्रदेशात आणि तिथल्या लोक-परंपरेत विविध तालवाद्य आणि विविध घनवाद्य रुळलेली आहेत. मृदंग, झांझ, टाळ ही तर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेत लोकप्रिय वाद्ये आहेत. तरीही म्हणींच्या रचनांत मात्र टाळी-टिचकी इतकेच साधे उल्लेख येतात. मला हे निरीक्षणही गमतीदार वाटले.

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक