नर-नारायणाची ही जोडी केवळ दोन व्यक्तींची नसून मानवी आणि दैवी तत्त्वातील अद्वैत व्यक्त करणारे सांकेतिक रूपक आहे. ही ध्यानमग्न जोडी आपल्याला हा संदेश देते की दैवी आणि मानवी ही तत्त्वे परस्परविरोधी नाहीत, ते सह-तपस्वी आहेत. ही कल्पना गुप्तकालीन वैष्णव विचारसरणीचा केंद्रबिंदू आहे आणि देवगढच्या ह्या शिल्पात ती दृश्यरूपात साकारते. हे शिल्प आपल्याला नुसतं भारावून टाकत नाही. ते आपल्याला शांतवतं, स्वतःकडे वळायला लावतं. हे शिल्प आपल्याला शिकवतो की साधना म्हणजे काहीतरी बनणं नाही, साधना म्हणजे स्वतःमध्येच स्थिर होणं.
ह्या आधीच्या लेखात आपण बघितले की उत्तरप्रदेश मधील झांशीजवळचे देवगढचे दशावतार मंदिर म्हणजे गुप्तकालीन मंदिर स्थापत्याचा एक उत्तम नमुना आहे. लाल वालुकाश्मात बांधलेल्या ह्या मंदिराची अधिपती देवता म्हणजे श्रीविष्णू. तत्कालीन वैष्णव तत्त्वज्ञानाला दृश्य स्वरूप देणारे चार अप्रतिम शिल्पपट्ट ह्या मंदिराच्या भिंतीवर चारही बाजूंनी कोरलेले आहेत. त्यातल्या देवकीच्या त्यागाची गोष्ट सांगणार्या एका शिल्पाची ओळख आपण गेल्या लेखात करून घेतली. ह्या लेखात आपण दशावतार मंदिरातले नर-नारायणाचे शिल्प समजून घेणार आहोत.
ह्या मंदिरातला हा नर-नारायण शिल्पपट्ट केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हिंदू पुराकथांनुसार नर आणि नारायण हे दोन युगल ऋषी असून त्यांनी बदरिकाश्रम म्हणजे आजचे बद्रीनाथ येथे एका बोरीच्या झाडाखाली तपःश्चर्या केली होती. भागवत पुराणानुसार नारायण म्हणजे स्वतः विष्णू - म्हणजेच दैवी तत्त्व, तर नर म्हणजे अध्यात्मिक साधना करून स्वतः परिपूर्ण झालेली मानवी चेतना. ही नर-नारायणाची जोडी केवळ दोन व्यक्तींची नसून मानवी आणि दैवी तत्त्वातील अद्वैत व्यक्त करणारे सांकेतिक रूपक आहे.
भागवत पुराण, विष्णू पुराण आणि महाभारत या तिन्ही ग्रंथांमध्ये नर-नारायणांनी केलेल्या कठोर तपश्चर्येचा उल्लेख आहे. ही तपश्चर्या त्यांच्या स्वतःच्या मोक्षासाठी नसून लोकसंग्रहासाठी, म्हणजे विश्वातील धर्म, संतुलन आणि ऋतू टिकवण्यासाठी केलेली आहे. त्यांच्या तपशक्तीने इंद्र भयभीत होतो आणि त्यांना आपल्या तपापासून विचलित करण्यासाठी अप्सरांना पाठवतो. परंतु नर-नारायण हे दोघेही मानवी इच्छांपलीकडे गेलेले असतात. इंद्राच्या असुरक्षिततेच्या भावनेला मनोमन हसत नारायण स्वतःच्या उरूपासून म्हणजे मांडीतून इंद्राने पाठवलेल्या अप्सरांपेक्षाही एक दिव्य आणि सुंदर अप्सरा निर्माण करून इंद्राला त्याचे स्थान दाखवतात तीच उर्वशी! महाभारतात पुढे सांगितले आहे की कृष्ण आणि अर्जुन हेच त्या युगातले नर-नारायणांचे अवतार आहेत. तपश्चर्या आणि कर्म, ध्यान आणि कृती ह्यांच्यामधल्या समन्वयाचे नर-नारायण प्रतीक आहेत. कदाचित हे तत्त्वज्ञान सामान्य लोकांना कळावे म्हणूनच तत्कालीन मंदिर निर्माणकर्त्यांनी ह्या शिल्पपट्टाच्या विषयाची निवड केली असावी. तत्कालीन गुप्त सम्राट हे स्वत:ला तत्कालीन राजकीय अराजकता संपवून धर्म आणि ऋताची पुनर्स्थापना करणारे मानतच होते, हे आपण ह्याआधीही वराह शिल्पांचा अभ्यास करताना पाहिलं आहे. त्याचीच पुढची पायरी म्हणजे हे नर-नारायणाचे शिल्प.
नीट पहा हे शिल्प. बोरीच्या झाडाच्या घनदाट छायेत दोन आकृती ध्यानस्थ बसलेल्या आहेत. त्यांची अर्धोन्मीलित दृष्टी त्यांच्या नासाग्राकडे वळलेली आहे. चेहेर्यावर अत्यंत शांत भाव आहेत. दर्शकाच्या डावीकडे नारायण बसलेले आहेत. त्यांचे देवत्व दाखवण्यासाठी ह्या आकृतीला चार हात दाखवलेले आहेत तर नर द्विभुज आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात शरीरशास्त्राच्या दृष्टीने अतिशय वास्तववादी वाटणार्या या शिल्पाकडे जवळून पाहिल्यावर समजते की नारायण जसे बसलेले आहेत तशी शरीराची वक्रता आणि लवचिकता मानवी शरीरासाठी अशक्य आहे. नारायणाच्या जमिनीकडे वळलेल्या उजव्या पावलाकडे पहा, पाऊल तसे वळवणे कुठल्याही मानवी व्यक्तीला शक्य नाही. नारायणाचे देवत्व आपल्या मनावर ठसवण्यासाठी ही निवड शिल्पकाराने मुद्दाम केलेली आहे.
नर आणि नारायण ह्या दोन्ही मूर्तींच्या शरीराच्या रेखा ह्यांना नृत्यमग्न आकृतींसारखा सुंदर बाक दिलेला आहे. नारायणाचे मस्तक नराकडे झुकलेले आहे तर नराचे नारायणाकडे. दोन्ही मूर्तींच्या हातांची बोटे पातळ आणि लांब आहेत. दोघांच्याही केसांचा जटाभार अत्यंत कलात्मकरित्या रचलेला आहे. त्यातून खाली उतरलेल्या जटा दोघांच्याही खांद्यावर रुळत आहेत. ध्यानमग्न योग्याची खूण म्हणून दोन्ही आकृतींनी खांद्यावर मृगाजिन पांघरलेले आहे. त्यांच्या देहयष्टीत साधनेचा शिस्तबद्ध संयम दिसतो. स्नायू पिळदार आहेत, पण वीरश्रीचा आव नाही. इथले कोरीव काम शांततेचा आभास निर्माण करणारे आहे. नारायणाच्या वरच्या दोन हातांमध्ये अक्षमाला आणि कमळकळी आहे, ज्ञानाची आणि पावित्र्याची प्रतीके. भोवतालच्या लहान आकृती, दोन्ही बाजूंना उभे असलेले शिष्य, वर आकाशातल्या अप्सरा आणि गंधर्व शिल्पाच्या मध्यवर्ती शांततेला कुठेही बाधा आणत नाहीत. शिल्पकाराचे कौशल्य आणि बुद्धिमत्ता इथे स्पष्ट दिसते. संपूर्ण शिल्पपट्टाचा केंद्रबिंदू म्हणजे नर-नारायणांचे तप आणि त्यातून निर्माण होणारी शांतता आहे. ह्या शिल्पाकडे नुसते थोडा वेळ टक लावून पाहिले तरी शांत शांत वाटते.
नराच्या मूर्तीखाली एक सिंह एकावर एक असे पंजे ठेवून बसलेला आहे, तर नारायणाच्या मूर्तीखाली शांत बसून नारायणाकडे मान उंचावून पाहणारी हरिणे आहेत. सामान्यतः सिंह आणि हरीण हे प्राणी अनुक्रमे शिकारी आणि भक्ष्य ह्या गटात मोडत असल्यामुळे इतक्या शांतपणे एकमेकांच्या सान्निध्यात कधीच बसलेले दिसणार नाहीत, पण बद्रिकाश्रमातले वन हे नर-नारायणाच्या तपःसामर्थ्यामुळे पवित्र झालेले असल्यामुळे हे शक्य आहे. ह्या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांना एकाच चौकटीत शांतपणे बसलेले दाखवून शिल्पकाराने नर-नारायणाचे तपःसामर्थ्य आणि त्याचा भोवतालच्या निसर्गावर होणारा परिणाम न बोलता दाखवला आहे. नर-नारायण आपल्या साधनेत गुंग आहेत. इतक्या गहन साधनेला आशीर्वाद द्यायला वर आकाशात त्रिदेव आलेत, मध्ये कमळावर बसलेले ब्रह्मदेव, डावीकडे विष्णू आणि लक्ष्मी आणि उजवीकडे शिव-पार्वती.
नर-नारायणाची ध्यानमग्न जोडी आपल्याला हा संदेश देते की दैवी आणि मानवी ही तत्त्वे परस्परविरोधी नाहीत, ते सह-तपस्वी आहेत. ही कल्पना गुप्तकालीन वैष्णव विचारसरणीचा केंद्रबिंदू आहे आणि देवगढच्या ह्या शिल्पात ती दृश्यरूपात साकारते. येथे शिल्पकार नारायण नरापेक्षा मोठा दाखवत नाही. दोन्ही आकृती समान प्रमाणात कोरल्या गेल्या आहेत. फक्त नारायण चतुर्भुज आहे आणि नर द्विभुज, इतकाच फरक. प्रख्यात हिंदू मंदिरस्थापत्य शास्त्र अभ्यासक स्टेला क्रॅमरीश आपल्या The Hindu Temple या ग्रंथात लिहितात की, गुप्तकालीन शिल्पकला ‘देवत्व आणि मानवी सिद्धी यांमधील अंतर कमी करते आणि देवत्वाला अलौकिक अतिरेक नव्हे, तर परिपूर्ण संतुलनाची अवस्था म्हणून मांडते.’ जे आपल्याला ह्या शिल्पामधून दिसते.
शैलीदृष्ट्या हा शिल्पपट्ट सहाव्या शतकातील परिपक्व गुप्तकालीन शिल्प परंपरेत मोडतो. प्रमाणबद्धता, चेहेर्यावरचे मृदू, शांत पण ठाम भाव, ध्यानमग्न असलेले अंतर्मुख चेहरे, पिळदार, पण अतिशयोक्त नसलेली शरीरयष्टी आणि मुख्य म्हणजे शिल्पाला अभिप्रेत असलेला शांतरस ह्या शिल्पात फार सुंदररित्या दाखवलेला आहे. नाट्यशास्त्रात नमूद केलेल्या नवरसांचा अभ्यास करताना आनंद कुमारसामीनी करुण रसाला भारतीय कलेतील सर्वोच्च आध्यात्मिक रस मानले आहे, जो ह्या शिल्पपट्टाच्या प्रत्येक रेषेतून दिसतो. हे शिल्प घडवणार्या अनामिक शिल्पकारांनी जाणूनबुजून खोल खोदकाम टाळलेले आहे ज्यामुळे तीव्र प्रकाश-छायेचा आभास ह्या शिल्पात कुठेही होत नाही. नर आणि नारायण ह्या दोन्ही मूर्तींवर प्रकाश तितक्याच सौम्यपणे आणि समानपणे फिरतो आणि तत्त्वज्ञान अधोरेखित करतो. मानवी आणि दैवी तत्त्वातील अद्वैत व्यक्त करतो. ह्या शिल्पात नर-नारायण सोडले तर इतर कुठलाही बिंदू किंवा आकृती आपले लक्ष वेधून घ्यायला उत्सुक नाही.
आजच्या काळात अध्यात्म म्हणजे काहीतरी कठोर, भव्य, दिव्य असे समीकरण झाले असताना, हे शिल्प आपल्याला साधनेचा खरा अर्थ शिकवते. गुप्तकालीन कलादृष्टीत देवतत्त्व अंतर्मुख आहे, शांत आहे, जगाच्या कल्याणाचा विचार करणारे आहे. हा शिल्पपट्ट म्हणजे नुसते साधनेचे शिल्प नाही. ह्या शिल्पाचा आस्वाद घेणं, त्याचा अर्थ समजावून घेणं ही देखील दर्शकांसाठी एक साधना आहे, आणि कदाचित हाच गुप्तकालीन शिल्पकलेचा सर्वात मोठा वारसा आहे.
देवगढच्या नर-नारायणासमोर उभं राहिल्यावर काहीतरी वेगळंच घडतं. इथे डोळे भरून येत नाहीत, श्वास रोखला जात नाही, रोमांचही उभे राहत नाहीत. उलट, मन हळूहळू स्थिर होत जातं. विचारांचा धुरळा आपोआप खाली बसतो आणि दैनंदिन आयुष्याच्या कोलाहलात नजरेआड झालेला मनातला कुठलातरी शांततेचा कोपरा उजळून निघतो. हे शिल्प आपल्याला भारावून टाकत नाही. ते आपल्याला शांतवतं, स्वतःकडे वळायला लावतं. देवगढचा नर-नारायण आपल्याला शिकवतो की साधना म्हणजे काहीतरी बनणं नाही, साधना म्हणजे स्वतःमध्येच स्थिर होणं.