1965 च्या ऑपरेशन डेझर्ट हॉकच्या भारताच्या पावित्र्याचा नेमका चुकीचा अर्थ पाकने लावला आणि भारत घाबरला असे समजून ऑगस्ट 1965 मध्ये पुढची सोंगटी पुढे सरकवली - ऑपरेशन जिब्राल्टर. आधुनिक लष्करी सामग्रीसह काश्मीरमध्ये घुसले. 1947-48 मध्ये घेता न आलेला काश्मीर आता भारताच्या तावडीतून मिळवायचाच या निर्धाराने नऊ ब्रिगेडस्चा हा जिब्राल्टर फोर्स नियंत्रण रेषेचा भंग करून भारतीय प्रदेशात घुसला.
’ऑपरेशन डेझर्ट हॉक’मध्ये पाकिस्तानला किंचितसे यश मिळाले. म्हणजे ’पॉईंट 84’ हे कच्छच्या रणातले एक ठाणे पाकने जिंकले. एप्रिल 1965 मध्ये झालेल्या या लढाईत पाकने भारताची चार ठाणी जिंकली होती. त्यातील तीन भारताने परत घेतली. तेवढ्यात राजनैतिक पातळीवर जोरदार हालचाली होऊन युद्धबंदी झाली. यामुळे चौथे ठाणे पाककडे राहून गेले. याला विजय म्हणत नाहीत. पण तो विजय आहे, अशी पाकने स्वतःची समजूत करून घेतली आणि ऑगस्ट 1965 मध्ये चढाईचा दुसरा टप्पा सुरू केला. याचे नाव होते ’ऑपरेशन जिब्राल्टर.’
इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकात इस्लामी अरब सेनापतींनी भूमध्य समुद्राच्या काठाकाठाने आफ्रिका खंडाचा उत्तर किनारा जिंकायला सुरुवात केली. आफ्रिका खंड आणि युरोप खंड जिथे अगदी जवळ येतात तिथेच भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागरही एकमेकांना भेटतात. आधुनिक काळात आफ्रिकेच्या किनार्यावरचा देश आहे मोरोक्को आणि युरोपच्या किनार्यावरचा देश आहे स्पेन. या दोघांच्या मधोमध असलेली एक चिंचोळी सामुद्रधुनी ओलांडून इसवी सन 711 या वर्षी इस्लामी अरब सेनापती तारीक -बिन-झियाद याने आफ्रिकेतून युरोपात विजयी पदार्पण केले होते. युरोप खंडाच्या या टोकाला एक भलामोठा चुनखडीचा खडक किंवा डोंगर आहे. तिथपासून तारीकने आपल्या युरोपातील दिग्विजय सुरू केला. म्हणून त्या खडकाला किंवा डोंगराला त्याचेच नाव देण्यात आले ’जबल्-अल्-तारीक’ म्हणजे तारीकचा डोंगर. या जबल्-अल्-तारीक चा युरोपीय अपभ्रंश झाला जिब्राल्टर.
अगदी आजही जिब्राल्टर हे व्यापारी आणि सैनिकीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठाणे आहे. अरबांकडून प्रथम ते स्पेनने हिसकावून घेतले. नंतर इंग्रजांनी ते स्पेनकडून स्वतःच्या पदरात पाडून घेतले. आजही ते ब्रिटनच्याच ताब्यात आहे. पण तारीकच्या युरोपीय दिग्विजयाची सुरुवात म्हणून जिब्राल्टरला आजही जगभरच्या मुसलमानांच्या भावविश्वात महत्त्वाचे स्थान आहे.
हे लक्षात घेऊनच ऑगस्ट 1965 मधल्या पाकिस्तानी कारवाईचे नाव ठेवण्यात आले होते - ऑपरेशन जिब्राल्टर. पाकिस्तानी सैन्याच्या नऊ ब्रिगेडस्नी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय काश्मीरमध्ये गुपचूप प्रवेश करायचा, हे सैनिक गणवेशात नसून स्थानिक नागरी वेशात असतील. त्यांनी लुटालूट करणे, आगी लावणे, भारतीय सैनिकी आणि पोलीस चौक्यांवर हल्ले करणे, छोटे-मोठे पूल उडवून देणे अशा घातपाती कारवाया करायच्या होत्या, ही कृत्ये काश्मिरी नागरीक करत आहेत. कारण त्यांंना भारतात राहायचे नाही, अशा प्रकारची जोरदार प्रचारमोहीम पाक माध्यमांनी करायची आणि जगाची दिशाभूल करायची, असा हा एकंदर डाव होता. या नऊ ब्रिगेडस्ना सलाउद्दीन, गझनवी, तारीक, बाबर, कासीम, खालिद, नुसरत, खिलजी आणि सिकंदर अशी नावे देण्यात आली होती. हे सगळे लोक इस्लामच्या इतिहासातले पराक्रमी आणि विजेते सेनापती म्हणून प्रसिद्ध होते. एका ब्रिगेडमध्ये साधारण 3 ते 5 हजार सैनिक असतात. या नऊ ब्रिगेडस्ची मिळून संख्या 30 ते 40 हजार होती. या सगळ्यांना मिळून ’जिब्राल्टर फोर्स’ असे नाव देण्यात आले. त्यांचा प्रमुख होता पाक सैन्यातील एक अगदी तरुण आणि उत्साही सेनापती मेजर जनरल अख्तर हुसेन मल्लिक.
कोण गाफील? अयुब की शास्त्री?
आता इथे आश्चर्य वाटते पाकिस्तानचे सर्वेसर्वा फील्ड मार्शल अयुबखान यांचे आणि परराष्ट्रमंत्री भुत्तो आणि परराष्ट्र सचिव अझिज अहमद यांचे. कच्छमधील कथित विजयामुळे भारताचे पंतप्रधान आणि सेनापती युद्ध करण्याच्या स्थितीत नाहीत, अशी त्यांनी उगीचच समजूत करून घेतली, याला गाफिलपणा म्हणावे की पोकळ घमेंड? जीनांच्या ’डायरेक्ट अॅक्शन’च्या आदेशाला आणि त्यापाठोपाठ झालेल्या भयानक कत्तलींना त्यावेळचे हिंदू नेते घाबरले होते. आता ते नेते नव्हते आणि भारतीय सैन्य तर पाकला कधीच घाबरले नव्हते.
भारतीय लष्कर प्रमुख जनरल चौधरी आणि भारतीय पंतप्रधान शास्त्रीजी अत्यंत सावध होते. पाकने ऑपरेशन डेझर्ट हॉक सुरू केले 9 एप्रिल 1965 रोजी. शास्त्रीजींनी त्याआधीच दोन दिवस म्हणजे 7 एप्रिल रोजी एक सर्वपक्षीय बैठक बोलावून, कच्छच्या रणामध्ये पाकिस्तान काय उद्योग करत आहे आणि त्याबाबत भारत काय उपाय योजत आहे, याची तपशीलवार माहिती दिली. या बैठकीत भारतीय जनसंघाचे प्रतिनिधी म्हणून खासदार अटलबिहारी वाजपेयी आणि खासदार बॅरिस्टर उमाशंकर त्रिवेदी उपस्थित होते.
नंतरच्या संपूर्ण युद्धकाळात शास्त्रीजींनी वारंवार अशा सर्वपक्षीय बैठका घेऊन त्यात सरकार योजत असलेल्या उपायांची माहिती दिली. विरोधी पक्षांना विश्वासात घेतले. त्यांच्या सूचना विचारल्या आणि योग्य वाटल्यास स्वीकारल्या देखील.
शास्त्रीजींच्या बैठकीत प.पू. श्रीगुरुजी
एप्रिल किंवा मे 1965 चा काळ, सरसंघचालक प. पू. श्री गोळवलकर गुरुजी महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात प्रवास करत होते. एका रणरणत्या दुपारी सांगली शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरचा दूरध्वनी खणखणला. त्याने तो उचलल्यावर त्याला सांगण्यात आले की, दिल्लीहून ट्रंककॉल आहे. मग दिल्ली एक्स्चेंजचा ऑपरेटर लाईनवर आला आणि म्हणाला, ’इकडे बोला, पंतप्रधान कार्यालयातून फोन आहे.’ लगेच एक भारदस्त आवाज सांगलीच्या कार्यकर्त्याच्या कानी आला - ’‘मी पंतप्रधान कार्यालयातून पंतप्रधान शास्त्रीजींचा सहायक सत्यनारायण सिन्हा बोलतोय. स्वतः पंतप्रधानांना गोळवलकर गुरुजींशी बातचीत करायची आहे. त्यांना कृपया लाईनवर बोलवा.”
’‘ते आता इथे नाहीत. सांगली शहरातच अन्यत्र आहेत. मी त्यांना निरोप देतो. पण आम्हाला इथून दिल्लीची लाईन मिळायला फार अडचण पडते,” कार्यकर्ता म्हणाला.
’‘होय. तुम्ही असं करा. अमुक एक क्रमांक फिरवा म्हणजे दोन मिनिटांत तुम्हाला दिल्लीचा ऑपरेटर मिळेल. त्याला तुम्ही थेट पी.एम.ओ.ला जोडून द्यायला सांगा. मात्र शक्य तितक्या लवकर गुरुजींना लाईनवर बोलवा. पंतप्रधान वाट पाहात आहेत,” सत्यनारायण सिन्हा म्हणाले.
सत्यनारायण सिन्हांनी आपली ओळख पंतप्रधानांचा सहाय्यक अशी दिली असली तरी प्रत्यक्षात ते केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री होते. कार्यकर्ता धावत-पळत संघचालक मा. काशिनाथपंत लिमये यांच्या घरी पोचला, प.पू. श्रीगुरुजी आणि प्रांत संघचालक मा. बाबाराव भिडे भोजनोत्तर विश्रांती घेत होते. हा निरोप मिळताच श्रीगुरुजी आणि त्यांच्यासह काशिनाथपंत आणि बाबाराव तातडीने कार्यकर्त्याच्या घरी पोचले. सत्यनारायण सिन्हांनी सांगितलेल्या पद्धतीने कॉल लावण्यात आला आणि खुद्द पंतप्रधान लाईनवर आले.
’‘आपले पाकिस्तानशी युद्ध सुरू झाले आहे. त्याकरिता मी उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान कार्यालयात सर्वपक्षीय बैठक ठरवली आहे. गोळवलकर जी, आपण या बैठकीला अवश्य उपस्थित राहावे, अशी माझी विनंती आहे,” पंतप्रधान म्हणाले.
यावर खळखळून हसत श्रीगुरुजी म्हणाले, ’‘मी कुठे कोणत्या पक्षाचा नेता आहे?”
’‘हे पाहा, गोळवलकर जी, ते काही मला सांगू नका. मला तुम्ही उद्याचा बैठकीत हवेच आहात. अन्यथा ही बैठकच होणार नाही,” पंतप्रधान म्हणाले.
’‘अहो, पण मी महाराष्ट्रात अंतर्भागात प्रवासात आहे. मी उद्या सकाळी दिल्लीला कसा पोचू शकेन?” श्रीगुरुजी म्हणाले.
’‘तुम्ही सांगलीहून पुण्यात पोचावे. तिथे तुमच्यासाठी दिल्लीचं विमान तयार असेल,” पंतप्रधान उत्तरले आणि फोन बंद झाला.
या संवादातील संदर्भावरून असे दिसते की, ही बैठक एप्रिल किंवा मे 1965 मध्ये म्हणजे कच्छमधील लढाई चालू असतानाच झाली असावी. या बैठकीतला एक प्रसंग प. पू. श्रीगुरुजींनी नंतरच्या एका भाषणात सांगितला होता. डाव्या विचारांचा एक नेता भर बैठकीत पंतप्रधानांना तावातावाने ओरडून सांगू लागला, ’युवर गव्हर्नमेंट हॅज नॉट डन धिस, युवर आर्मी मस्ट डू धिस.’ आणि दरवेळी गुरुजी त्याला सांगत होते, ’मिस्टर...., प्लीज से अवर गव्हर्नमेंट, प्लीज से अवर आर्मी.’ श्रीगुरुजींनी स्वतः त्या माणसाचे नाव घेतले नाही, पण अन्य माहीतगार लोकांकडून ते नाव समजले. समाजवादी पक्षाचे अत्यंत हुशार, पण तितकेच तापट खासदार मधू लिमये. या मधू लिमयांनीच पुढे 1978 साली संघाच्या आणि हिंदुत्वाच्या भयंकर द्वेेषातून जनता पार्टीचे सरकार पाडले. पण तो पुढचा इतिहास आहे.
आत्ताचा मुद्दा असा आहे की, भारत सरकार पाकच्या कारवायांबद्दल पूर्णपणे सतर्क होते आणि पाकने आततायीपणा केल्यास आवश्यक कृती करण्यास सज्ज होते. एप्रिल 1965 पासून जून 1965 पर्यंत ऑपरेशन डेझर्ट हॉक राबवल्यावर पाकला जेमतेम एक ठाणे ताब्यात ठेवता आले. भारतीय सैन्याने मोठा प्रतिकार केला नाही, मोठी लढाई लढण्यासाठी कच्छ ही अनुकूल भूमी नाही, असे जनरल चौधरींनी पंतप्रधानांना सांगितले आणि पूर्ण विचारांती शास्त्रीजींनी ते मान्य केले.
भारताच्या या पावित्र्याचा नेमका चुकीचा अर्थ पाकने लावला आणि भारत घाबरला असे समजून ऑगस्ट 1965 मध्ये पुढची सोंगटी पुढे सरकवली - ऑपरेशन जिब्राल्टर. पाकिस्तानचे 30 ते 40 हजार सैनिक नागरी वेशात, पण सर्व अत्याधुनिक लष्करी सामग्रीसह काश्मीरमध्ये घुसले. 1947-48 मध्ये घेता न आलेला काश्मीर आता भारताच्या तावडीतून मिळवायचाच या निर्धाराने नऊ ब्रिगेडस्चा हा जिब्राल्टर फोर्स नियंत्रण रेषेचा भंग करून भारतीय प्रदेशात घुसला. तो दिवस होता 5 ऑगस्ट 1965.