गर्वाचे घर खाली!

विवेक मराठी    20-Apr-2026   
Total Views |
विषय कुठलाही असो, म्हणींच्या आणि वाक्प्रचारांच्या माध्यमातून परंपरेद्वारे सिद्ध झालेले असे सूत्र अगदी थोड्या शब्दात सांगणार्‍या ह्या म्हणी थोड्याफार फरकाने देशभरातील सर्व भाषांत आढळतात ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. एक भारतीय म्हणून आपण एकाच संस्कृतीचे, लोकपरंपरेचे भाग आहोत हेच या म्हणी आपल्याला सांगत असतात.
 
 

vivek 
सध्या जगात एक युद्ध सुरू आहे. वरच्या म्हणीचा प्रत्यय या युद्धात येतो आहे. आम्ही सामर्थ्यवान देश आहोत आणि आम्ही हे युद्ध 4-6 दिवसांत संपवून टाकू अशी स्वत:बद्दल भरमसाठ कल्पना असणारे देश 6-8 आठवडे झाले तरी ‘युद्ध-ग्रस्त’च आहेत. माणूस कोणत्या स्तराला जाऊ शकतो याची कल्पना असल्यामुळेच की काय पण गर्वाचे घर खाली असे सांगत कर्तृत्ववान माणसांना देखील जमिनीवर ठेवण्यासाठी या आशयाच्या म्हणी सर्व भारतीय भाषांत निर्माण झाल्या आहेत. कोशकार कै. विश्वनाथ नरवणे यांनी केलेल्या ‘भारतीय कहावत संग्रह’ या ग्रंथात गर्वाचे घर खाली याच म्हणीच्या आशयाच्या देशभर मिळणार्‍या म्हणींचे एक स्वतंत्र प्रकरण आहे.
 
 
हिंदी भाषेत ‘गरब का सर नीचा’ अशी म्हण आहे. उर्दूमध्ये ‘जो सर उठायेगा, वो ठोकर खायेगा’ अशी म्हण आहे. गुजराती भाषेत ‘अहंकारनु घर खाली’ किंवा ‘गर्वनुं घर नीचु’ं असे म्हटले आहे. असमिया भाषेत ‘अति गर्वामुळे लंकेचा विनाश झाला’ अशी म्हण आहे तर तेलुगू भाषेत ‘घमेंडखोर माणसाचे डोके खाली’ असे सांगणारी म्हण आहे. म्हणजे भारताच्या चार दिशांच्या भाषांत ‘गर्वाचे घर खाली’ ही म्हण अगदी थोड्या फरकाने तशीच्या तशी रूढ आहे.
 
 
या व्यतिरिक्त अनेक भाषांत हाच अर्थ, हाच आशय अजून वेगवेगळ्या प्रकारे सांगणार्‍या म्हणी देखील आहेत. उदाहरणार्थ उर्दू मध्ये ‘खुदी और खुदाई में बैर है’ अशी एक म्हण आहे. अर्थ स्पष्ट आहे की ईश्वराला अहंकारी माणसे आवडत नाहीत. सिंधी भाषेत ‘धन, धान्य, संतती यांची वृद्धी होवो पण अहंकाराची वृद्धी न होवो’ असे सांगणारी म्हण आहे. गुजरातीत अति फुगला तो लवकर फुटला असे सांगितले आहे, तर बांगला भाषेत अहंकारामुळे बाली गावाच्या ‘दत्त’खानदानाचा र्‍हास झाला अशी म्हण आहे. बाली गाव आणि दत्त खानदान वगैरे आशय बहुदा स्थानिक किंवा पारंपरिक संदर्भ असणारा असावा. तमिळ भाषेत हा आशय सांगणार्‍या दोन म्हणी आहेत. योग्यतेची किंमत चार पैसे तर खोट्या गर्वाची किंमत तीन पैसे अशी एक म्हण आहे. शिवाय गर्वाने भरलेले सूप असेल तर पाखडल्या नंतर काहीच शिल्लक उरणार नाही, असे स्पष्टपणे सांगणारी एक म्हण आहे.
 
 
विषय कुठलाही असो, म्हणींच्या आणि वाक्प्रचारांच्या माध्यमातून परंपरेद्वारे सिद्ध झालेले असे सूत्र अगदी थोड्या शब्दांत सांगणार्‍या ह्या म्हणी थोड्याफार फरकाने देशभरातील सर्व भाषांत आढळतात ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. भाषा, लिपी, पेहराव, जेवण-खाण यात दिसणारे फरक हे वरवरचे आहेत. एक भारतीय म्हणून आपण एकाच संस्कृतीचे, लोकपरंपरेचे भाग आहोत हेच या म्हणी आपल्याला सांगत असतात. काही राज्यांत येत्या काळात निवडणुका होत आहेत. आसाम, बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील निवडणुकांचे जेव्हा निकाल लागतील तेव्हा ‘गर्वाचे घर खाली’ या आशयाच्या त्या त्या भाषांतील म्हणी शोधून पडताळून बघणे हा मोठाच मनोरंजक प्रकार असेल.

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक