देशाशी उभा द्रोह करणारी काँग्रेस

विवेक मराठी    18-Jul-2026   
Total Views |
आरोप त्यांच्या विरोधात असलेले राजकीय पक्ष करत नसून त्यांच्या कार्यकाळात अधिकारपदावर काम केलेली एक जबाबदार आणि सर्व प्रकारचा छळ सोसूनही हिंदू दहशतवाद हे मिथक नीडरपणे मोडून काढणारी व्यक्ती करत आहे, म्हणून ही मुलाखत गांभीर्याने घेतली पाहीजे. राष्ट्रीय दर्जाचा आणि सगळ्यात जुना राजकीय पक्ष मुळात किती देशद्रोही असू शकतो याचे उदाहरण म्हणून यापुढे काँग्रेस ओळखली जाईल. दहशतवादी कृत्यांना मोकळे रान देऊन त्यांनी या देशाचे जे नुकसान केले आहे ते अक्षम्य आहे.
 
congress
 
भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले माजी केंद्रीय सनदी अधिकारी आर. व्ही.एस. मणी यांनी अलीकडेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीमुळे काँग्रेसची हिंदूद्वेष्टी आणि मुस्लीम तुष्टीकरणाची मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागात अवर सचिव पदावर काम केलेल्या मणी यांनी या पॉडकास्टमध्ये भारतातील दहशतवादविरोधी तपास, हिंदू दहशतवाद या मिथकाची हेतूपुरस्सर करण्यात आलेली निर्मिती आणि इशरत जहाँ एन्काउंटर, मालेगाव बाँबस्फोट, समझौता एक्सप्रेस स्फोट अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये असलेला राजकीय दबाव याबाबत गंभीर दावे केले आहेत. हे दावे म्हणजे देशाच्या एकतेचा सौदा करायला निघालेल्या आणि त्यासाठी ‘हिंदू दहशतवाद’ हे हिंदूंना बदनाम करणारे मिथक तयार करायलाही मागेपुढे न पाहणार्‍या तत्कालीन राज्यकर्त्या काँग्रेसच्या कुकर्मांची यादीच आहे.
 
 
मणी यांनी त्यांच्या 2006 ते 2011 या कार्यकाळातील म्हणजे 26/11च्या हल्ल्यासह इशरत जहाँ एन्काउंटर, मालेगाव बाँबस्फोट, समझौता एक्सप्रेस स्फोट अशा देशाच्या एकात्मेतवर घाला घालणार्‍या घटनांचा कालखंड मांडला आहे. त्याच कालावधीत गोध्रा जळीतकांडापासून अनेक दहशतवादी कारवायांतील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियाही चालू होती. भारतात सातत्याने घडत असलेल्या दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानातील व्यक्ती, संस्था, संघटना, लष्कर, सरकार यांचा हात असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे प्रयत्न भारतीय गुप्तचर यंत्रणा करत होत्या. आणि तत्कालीन राज्यकर्ते मात्र अत्यंत हिडीस राजकारण करण्यात गुंतले होते. दहशतवादासारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयाकडे वस्तुनिष्ठपणे मिळवलेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे पाहण्याऐवजी राजकीय सोयीच्या चौकटीतून पाहण्याचा कसा प्रयत्न झाला याची तपशीलवार माहिती मणी यांनी एएनआयच्या मुलाखतीत दिली.
 
 
सनदी अधिकारी म्हणून हिंदू दहशतवाद या मिथकाच्या विरोधात लढा देणार्‍या मणी यांचा राज्यकर्त्या काँग्रेसने अनन्वित छळ केला. त्या छळाने आणि त्यांच्या विरोधात वापरलेल्या बळाने न डगमगता मणी ठामपणे उभे राहिले. या मिथकाला विरोध करत राहिले. त्यांच्या कार्यकाळातल्या अनुभवांवर आधारित ‘द मिथ ऑफ हिंदू टेरर’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. ज्या संपुआच्या हातात देशाची सत्तासूत्रे होती, त्यांचे नेतृत्व करणारी काँग्रेसच देशविरोधात कोणत्या थराला पोचली होती याची झलक या पुस्तकात आहे. आणि त्याचे पुरावे मणी यांनी एएनआय पॉडकास्टमध्येही दिले आहेत.
 
 
सुमारे 17 वर्षांपूर्वी 26/11 रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणांवर झालेले भीषण दहशतवादी हल्ले आजही आपल्या स्मरणात आहेत. त्या निवव्ळ आठवणीच नाहीत तर प्रत्येक देशप्रेमीच्या मनाला झालेली, कधीही भरून न येणारी भळभळणारी जखम आहे. त्यावेळी स्वत: मरण पत्करून अजमल कसाबला जिवंत पकडणार्‍या निधड्या छातीच्या कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळेंचे या देशावर आणि इथल्या प्रत्येक नागरिकावर न फिटणारे ऋण आहे. कसाब जिवंत सापडल्यामुळेच हा हल्ला पाकिस्तानी आयएसआय पुरस्कृत होता आणि जिहादी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी केलेला होता हे ठोस पुराव्यानिशी सिद्ध करता आले होते.
 
 
या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे असंख्य पुरावे भारताने पाकिस्तान सरकारकडे सोपवले होते. मात्र ते सर्व फेटाळत पाकिस्तानने त्यांना केराची टोपली दाखवली तरी काँग्रेसने त्याचा निषेध केला नाही. इतकेच नव्हे तर, या हल्ल्यानंतर प्रतिहल्ला करण्यास भारतीय लष्कर तयार असतानाही मनमोहन सिंग सरकारने त्यांना परवानगी दिली नाही असे मणी यांनी सांगितले. भ्याड आणि कणाहीन मनमोहन सिंग सरकारचे हे वर्तन अतिशय संतापजनक आहे. त्याही पुढे जाऊन हल्ल्यानंतर आठ-दहा महिन्यांनी इजिप्त इथे झालेल्या परिषदेनंतर पाकिस्तानबरोबर संयुक्त पत्रक काढून पाकिस्तान हा ही दहशतवादाचा बळी असल्याचे तत्कालीन भारत सरकारने म्हटले. मणी यांच्या दाव्यानुसार, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित फाईल्समध्ये सुरुवातीच्या काळात हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद अशी संज्ञा प्रचलित नव्हती. मात्र, 2010च्या आसपास या शब्दप्रयोगाला राजकीय आणि सार्वजनिक चर्चेत जाणीवपूर्वक स्थान मिळू लागले. दहशतवादाला धर्माशी जोडून विशिष्ट राजकीय कथानक उभे करण्याचा हा प्रयत्न होता, असा त्यांचा आरोप आहे. मालेगाव बाँबस्फोट तपास आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या प्रकरणातील तपासाची दिशा, संस्थात्मक दबाव आणि राजकीय हस्तक्षेपाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
मालेगावच्या दोन्ही बाँबस्फोटांमागे हुजी या कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची पुराव्यानिशी सबळ माहिती गुप्तचर यंत्रणांकडे सातत्याने येत होती. ती सरकारला पुरवली जात होती. परंतु या गंभीर माहितीची दखल घेतली गेली नाही.
 
 
त्याऐवजी एका विशिष्ट राजकीय हेतूने हिंदूंना लक्ष्य करून भगवा दहशतवाद हे मिथक तयार करण्यात आले. याचा जाहीर उच्चार महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पहिल्यांदा केला असला तरी त्यांचे बोलविते धनी दिल्लीत होते असे मणी यांनी म्हटले आहे. मुळात त्याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आणि पी. चिदंबरम यांनीही ही संज्ञा वापरली होती. भगवा दहशतवाद असे बिनदिक्कत म्हणणारे आणि सातत्याने व रेटून बोलून सर्वसामान्याची दिशाभूल करू पाहणारे हे सर्व काँग्रेसी हिंदू होते, हे विशेष.
 
 
ही कुकर्मे काँग्रेसप्रणित सरकार आणि त्यांच्या नेत्यांंच्या मानसिकतेची द्योतक आहेत. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारी काँग्रेस स्वातंत्र्योत्तर काळात किती वेगाने उतरणीला लागली याचे दर्शन यातून घडते आहे. मूळच्या मुस्लीमधार्जिणेपणाला अलिकडच्या काळात जे अधिकच हिडीस रूप आले आहे ते केवळ चीड आणणारे नाही तर या पक्षाविषयी, त्यांच्या नेत्यांच्या धारणांविषयी संशय, चिंता उत्पन्न करणारे आहे.
 
 
हे आरोप त्यांच्या विरोधात असलेले राजकीय पक्ष करत नसून त्यांच्या कार्यकाळात अधिकारपदावर काम केलेली एक जबाबदार आणि सर्व प्रकारचा छळ सोसूनही हिंदू दहशतवाद हे मिथक नीडरपणे मोडून काढणारी व्यक्ती करत आहे, म्हणून ही मुलाखत गांभीर्याने घेतली पाहीजे. राष्ट्रीय दर्जाचा आणि सगळ्यात जुना राजकीय पक्ष मुळात किती देशद्रोही असू शकतो याचे उदाहरण म्हणून यापुढे काँग्रेस ओळखली जाईल. दहशतवादी कृत्यांना मोकळे रान देऊन त्यांनी या देशाचे जे नुकसान केले आहे ते अक्षम्य आहे.