विघ्नसंतोषी विरोधक

विवेक मराठी    09-Jul-2026   
Total Views |
 Mumbai-Pune Connecting Link
 
पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते यावर सरकारने नव्याने अभ्यास चालू केला आहे. आयआयटी तज्ज्ञांशी चर्चा चालू आहे. जे बांधकाम जगातले आश्चर्य म्हणून ओळखले जाते आहे आणि जे लोकोपयोगी असल्याची खात्री तिचा वापर करणार्‍यांनी दिली आहे, त्या कनेक्टिंग लिंकच्या दुर्घटनेबाबत विरोधक संवेदनशील असते, या दृष्टीकोनातून चर्चेसाठी पुढे आले असते तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या सौहार्दाचे चित्र सर्वांसमोर आले असते.
 
cm devendra fadnavis
 
विरोधी बाकांवर बसलेल्यांनी सत्ताधार्‍यांच्या कामकाजावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे, हे त्यांचे मुख्य काम. त्यांच्या कामात काही चुका, त्रुटी दिसून आल्या तर त्याचा जाबही जरूर विचारावा. मात्र त्याला वस्तुस्थितीचे आणि संतुलित अभ्यासाचे अधिष्ठान असावे. टीकाही करावी; पण ती विधायक असावी. जनहिताच्या कामात दर्जात्मक सुधारणा सुचविणारी असावी. काम पुढे नेणारी असावी. कारण सत्तेत असोत वा विरोधी पक्षात...ही मंडळी सत्तेच्या राजकारणात येतात तीच मुळी जनहित साधण्यासाठी. याचे भान दोघांनीही कायम ठेवायला हवे. ते राखले गेले तर बेलगाम टीका, हेत्वारोप होणार नाहीत. मात्र जेव्हा कोणत्याही विषयाचे राजकारण करणे, पूर्वग्रहदूषित टीका करणे यात वाकबगार असलेली माणसे विरोधी पक्षांत असतात तेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. छिद्रान्वेषी वृत्ती आणि विघ्नसंतोषीपणा हे अशा विरोधकांचे विशेष गुण असतात. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी जनहिताची कामे केली तरी त्यांना त्यात वैगुण्य दिसते. जनहिताच्या योजना कार्यान्वित केल्या तरी टीका करण्यात ते धन्यता मानतात. म्हणूनच, विरोधक म्हणजे अविचारीपणाने जनहिताच्या कामांना विरोध करणारे अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या वागणुकीतून तयार झाली आहे. हे लिहिण्याला कारण म्हणजे गेल्या आठवड्यातली अतिवृष्टी आणि त्याचा नव्याने उभारलेल्या कनेक्टिंग लिंक(मिसिंग लिंक) वर झालेला परिणाम.
 
 
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने मुंबईसह ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणपट्ट्यात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी रस्त्यांना नद्यांचे रूप आले. भूस्खलन आणि झाडे पडल्याने काही प्रमाणात जीवितहानीही झाली. आपल्यापैकी अनेकांनी या अतिवृष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तर काहींनी प्रसारमाध्यमातून त्या विषयीच्या बातम्या पाहिल्या. या संदर्भातील सगळ्यात जास्त बातमी गाजली ती कनेक्टिंग लिंकवर(मिसिंग लिंक) झालेल्या दुर्घटनेची.
 
 
महाराष्ट्रातील मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सुमारे सात हजार कोटी रुपये खर्चून नव्याने उभारण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याजवळ दि. 6 जुलै रोजी दरड आणि सिमेंट स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर दगड, पाणी, माती, चिखल आणि कमानीचा मोठा भाग पडल्याने, 6 जुलैच्या पहाटे तीनपासूनच ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र काही गाड्या मलब्यात फसल्या होत्या त्या काढण्यात आल्या. पोलीस आणि प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव आणि दुरुस्तीचे काम हाती घेऊन दरड हटविणे, रस्ता स्वच्छ करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खातरजमा करून दुर्घटना घडल्यापासून 18 तासांत ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली.
 
 
त्याच वेळी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवरून टीकेची जोरदार मोहीम विरोधकांनी चालवली. कमानीवर दरड कोसळली असली तरी लिंकवरील पूल वा बोगद्याला काही झाले नाही ही वस्तुस्थिती असताना, ‘कनेक्टिंग लिंकच तुटली, त्यासाठी खर्च झालेले सात हजार कोटी पाण्यात गेले’, असा अपप्रचार सुरू केला. या बांधकामात भ्रष्टाचार झाला असल्याची टीकाही केली.
 
 
या कनेक्टिंग लिंकमुळे गेल्या काही महिन्यांत मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व सुसह्य झाल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. तरीही, अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनेचे निमित्त साधत टीका करण्यासाठी दबा धरून बसलेले विरोधक सरकारवर बरसले. पावसाळी अधिवेशन चालू असल्याने सभागृहात हा विषय येणे स्वाभाविक होते. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांच्या सर्व आक्षेपांना उत्तरे देत मुख्यमंत्र्यांनी शासन व प्रशासनाने या दुर्घटनेनंतर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. ते म्हणाले,“ज्यावेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली तेव्हा तिला विरोध करताना लोक म्हणाले...ही बांधू नका, चालू शकणार नाही. हिच्यावर दरडी कोसळतील. मधू दंडवते यांच्यात हिंमत होती म्हणून त्यांनी विरोधाला न जुमानता कोकण रेल्वे बांधून दाखवली. पुढे सुमारे 15 वर्षे कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी दरड कोसळायची. पण त्या प्रत्येक घटनेतून धडा घेत त्यावर काम केले गेले. दरडी कोसळण्याच्या भीतीने जर कोकण रेल्वे बांधलीच नसती तर काय अवस्था झाली असती याचा विचार करा. या मिसिंग लिंकबाबतीतही असेच घडले आहे. मागच्या आघाडीच्या सरकारमध्ये या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव तयार झाला. आणि त्या सरकारच्या मुख्यमंत्री महोदयांनी 14 कारणे देत ही मिसिंग लिंक करता येणार नाही असे सांगून फाईल बंद केली. आम्ही सत्तेत आल्यानंतर या विषयातील तज्ज्ञांशी, अधिकार्‍यांशी बोललो आणि त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर लिंक बांधायचा निर्णय केला. त्यातून इंजिनियरिंग विषयातले जगातले एक आश्चर्य तयार झाले. या माध्यमातून जगातला सगळ्यात रूंद बोगदा आणि भारतातला सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज तयार करून आपण दाखवला. या कामामुळे संपूर्ण घाट विभागात होणारे अपघात संपले, वाहतूक ठप्प होण्याचा प्रश्न निकालात निघाला. कालच्या दुर्घटनेनंतरही कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही. कुठल्याही बोगद्याला धोका नाही. मात्र विरोधकांनी अशी दृश्ये दाखवायला सुरुवात केली की, जणू काही कनेक्टिंग लिंकच तुटली.“
 
 
या घटनेनंतर पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते यावर सरकारने नव्याने अभ्यास चालू केला आहे. आयआयटी तज्ज्ञांशी चर्चा चालू आहे. जे बांधकाम जगातले आश्चर्य म्हणून ओळखले जाते आहे आणि जे लोकोपयोगी असल्याची खात्री तिचा वापर करणार्‍यांनी दिली आहे, त्या कनेक्टिंग लिंकच्या दुर्घटनेबाबत विरोधक संवेदनशील असते, या दृष्टीकोनातून चर्चेसाठी पुढे आले असते तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या सौहार्दाचे चित्र सर्वांसमोर आले असते.
 
 
पण तसे झाले नाही. अर्थात विरोधकांचे हे वागणे नवे नाही. समृद्धी महामार्ग सुरू झाला आणि सुरुवातीला त्यावर अपघात होऊ लागले तेव्हा याच विरोधकांनी मृत्यूचा सापळा असे लेबल या महामार्गाला लावले होते. जेव्हा ’वंदे भारत’ सुरू झाली आणि तिला जनावरे धडकण्याचे प्रकार घडले तेव्हा याच विरोधकांनी ’जनावरांच्या धडकांनी वंदे भारतचे पत्रे वाकले’, अशी कुत्सित टीकाही केली. हे सगळे एकाच जातकुळीचे विरोधक आहेत. त्यांना निवडून देणार्‍या मतदारांनी त्यांच्या या प्रवृत्तीकडे गांभीर्याने पाहायला हवे. आपला प्रतिनिधी निवडताना सावध असायला हवे.