नक्कल करायलाही अक्कल लागते!

कल्पनेच्या कायद्याची गोष्ट

विवेक मराठी    31-Jul-2026   
Total Views |
copyright
 
Copyright 
कल्पनेच्या सादरीकरणात कल्पकता असेल, नावीन्य असेल तर ते पूर्वीच्या आविष्काराच्या कॉपीराईटचं उल्लंघन ठरत नाही. उलट त्यावर नव्याने कॉपीराईट मिळू शकतो. हे घडू शकतं कारण कॉपीराईट हा कल्पनेच्या आविष्कारावर मिळतो, कल्पनेवर नाही. कायदा खोलात जाऊन असा विचार करतो म्हणूनच सृजनशीलतेला वाव मिळत राहील ह्याची खातरजमा करता येते.
गेल्या वेळी आपण ट्रेडमार्क्सबद्दलचे किस्से पाहू असं म्हटलं खरं पण वाचकांच्या प्रतिसादातून कॉपीराईटबाबतची त्यांची उत्सुकता माझ्या ध्यानात आली. मुख्यत: चित्रपट आणि गाण्यांच्या कॉपीराईटसंदर्भात बरीच विचारणा झाली.
 
 
खरं तर बौद्धिक संपदेत कॉपीराईट, पेटंट ट्रेडमार्क्स, GI अशा प्रत्येक मानकावर एक वेगळी लेखमाला होऊ शकते. वाचकांच्या आवडीप्रमाणे आपण किती खोलात शिरायचं हे ठरवू.
 
 
तर कॉपीराईटबाबत प्राथमिक माहिती आपण गेल्या दोन लेखांत पाहिली. चित्रपट आणि संगीताच्या झगमगत्या दुनियेत कॉपीराईटशिवाय पान हलत नाही. पण हा हक्क मुळात कल्पनेवर असतो की कल्पनेच्या आविष्कारावर हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
 
 
आपण पाहिलेल्या सगळ्या फिल्म्स, अगदी कोणत्याही भाषेतल्या, आठवून पहा. किती ठिकाणी अगदी वेगळा विषय, गाभा होता?
फिल्म्समध्ये प्रेम त्रिकोण, नाहीतर प्रेमात पडलेल्या जोडप्याला जुदा करायला उभी ठाकलेली कायनात हे हटकून दिसतंच. तसंच मालिकांमध्ये सासू-सून संघर्ष, वेबसिरीजमध्ये कोर्टरूम ड्रामा, न्यायासाठी कायदा हातात घेणे किंवा एखाद्या स्पर्धापरीक्षेची तयारी करणारी मुलं आणि त्यांची कथा ह्या गोष्टी किती वरचेवर पाहिल्यात आपण.
 
 
तरीही टीव्हीएफ कोटा फॅक्टरी, एस्पिरेंट्स आणि हाफ सीए अशा वेगवेगळ्या सिरीज काढते आणि त्या यशस्वीही होतात.
 
वो सात दिन, हम दिल दे चुके सनम आणि आता पाच सहा वर्षांपूर्वी आलेला अभिषेक आणि तापसी पन्नूचा मनमर्जिया हे मनाविरुद्ध झालेल्या लग्नानंतर नायिकेचा प्रियकरापेक्षाही नवर्‍यावर जीव जडणे ह्या एकाच कथाबीजाचे वेगवेगळे आविष्कार आहेत.
 
 कल्पनेच्या कायद्याची गोष्ट

Copyright 
 
आता ह्यातल्या कल्पनेवर जर कॉपीराईट दिला तर पहिल्या फिल्मनंतर पुढचं काही कधीच येणार नाही.
 
कुणाला वाटेल मग बरंच आहे की. मी टू प्रकारात चालणारं हे चित्रपट मालिकांचं दळण तरी बंद होईल.
 
पण हे इतकं सरळसोट सोपं नाहीये. कथाबीज एकच असलं तरी त्याच्याकडे पाहण्याची प्रत्येक लेखकाची, दिग्दर्शकाची दृष्टी पूर्णत: वेगळी असू शकते. त्यात स्थळ, काळ, भाषा ह्यांची परिमाणं बदलली की प्रत्येक गोष्टीचा बाज, पोत पूर्णपणे बदलू शकतो.
लायन किंग आणि बाहुबलीमध्ये खरं पाहिलं तर एक कथासूत्र नाहीये?
 
 
दोन्ही नायक आपल्या राजवंशापासून दूर, सर्वसामान्य बालपण जगत मोठे होतात. त्यांना आपल्या पूर्वायुष्याविषयी काहीही कल्पना नसते. सिंबाची आई सराबी आणि बाहुबलीची आई देवसेना या दोघीही त्यांचं मूल परत येण्यापूर्वी खलनायकांच्या क्रूर राजवटीत प्रचंड छळ सहन करतात. सिंबाचा सामना स्कारशी होतो तर बाहुबलीला भल्लादेवाशी दोन हात करून माहिष्मतीचं साम्राज्य मिळवावं लागतं.
 
 
ह्या कथानकांत कमालीचं साम्य आहे, पण तरीही हे दोन्ही चित्रपट पाहणं हे वेगवेगळे अनुभव आहेत.
 
 
हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा विनोदी अंगाने जाणारा आहे पण तेच दादासाहेब फाळक्यांच्या कर्तृत्वावर एखादी डॉक्युमेंटरी पाहिली तर ती माहितीपर आणि त्यातल्या हलाखीच्या वर्णनाने कारुण्यजनक वाटेल. मूळ कथानक तेच असूनही साधला जाणारा परिणाम मात्र वेगवेगळा.
 
 
म्हणूनच पिग्मॅलियन मधून भेटणारी जॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांची पात्रं माय फेयर लेडी चित्रपटात वेगळी भासतात आणि पुलंची फुलराणी ह्याच कथाबीजाद्वारे अनुवादाच्या पलीकडे अनुसर्जनाच्या पातळीवर जाऊन पोचते. हिगिन्सची एलिझा आणि फुलराणीतली मंजुळा ह्यांचा आत्मा सारखाच असला तरी कलाकृती पार बदलून जाते.
 
 
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आणि ’हॅम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ तरीही वेगळेच असतात.
 
‘अपराध मीच केला’ हे नानावटी खटल्यावर आधारित गाजलेलं नाटक येऊन गेल्याच्या कित्येक वर्षानंतर रुस्तम येतो आणि बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करतो.
 
 

 हे सुद्धा वाचा - कल्पनेतून संपदेकडे...

 
 
थोडक्यात काय तर त्याच कल्पनेच्या सादरीकरणात कल्पकता असेल, नावीन्य असेल तर ते पूर्वीच्या आविष्काराच्या कॉपीराईटचं उल्लंघन ठरत नाही. उलट त्यावर नव्याने कॉपीराईट मिळू शकतो.
 
हे घडू शकतं कारण कॉपीराईट हा कल्पनेच्या आविष्कारावर मिळतो, कल्पनेवर नाही. कायदा खोलात जाऊन असा विचार करतो म्हणूनच सृजनशीलतेला वाव मिळत राहील ह्याची खातरजमा करता येते.
 
आर. जी. आनंद हे एक प्रसिद्ध नाटककार होते. त्यांनी 1953 मध्ये ’हम हिंदुस्तानी’ नावाचे नाटक लिहिले. प्रांतवाद हा या सिनेमाचा मूळ गाभा होता. हे नाटक खूप गाजलं.
 
 
एक दिवस मोहन सहगल यांनी आनंद यांच्याशी संपर्क साधून नाटकावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. आनंद यांनी त्यांना नाटकाची संपूर्ण कथा ऐकवली खरी, पण सहगल यांनी स्पष्ट काही सांगणं टाळलं.
 
 
1956 मध्ये डिलक्स फिल्म्सने ’न्यू दिल्ली’ नावाचा चित्रपट प्रदर्शित केला. चित्रपट पाहिल्यानंतर आनंद यांना जाणवलं की चित्रपटाची मूळ संकल्पना, विषय आणि पात्रे त्यांच्या ’हम हिंदुस्तानी’ या नाटकावरच आधारित आहेत. त्यामुळे त्यांनी कॉपीराईट उल्लंघनाचा दावा ठोकून नुकसान भरपाई आणि चित्रपटावर बंदीची मागणी केली.
 
 
चित्रपटाची कथा, विषय आणि मांडणी माझ्या नाटकाची हुबेहूब नक्कल आहे असा आनंद यांचा युक्तिवाद तर प्रांतवाद हा एक सर्वसामान्य विषय असून आणि त्यावर कोणाचीही एकाधिकारशाही असू शकत नाही, तसंच चित्रपट आणि नाटकाच्या कथेचा शेवट, प्रसंगांची मांडणी आणि सादरीकरण यात खूप फरक आहे असा डिलक्स फिल्म्सचा बचाव. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही कलाकृतींचे बारकाईने निरीक्षण करून डिलक्स फिल्म्सच्या बाजूने निकाल दिला.
 

हे सुद्धा वाचा - कल्पनेतून संपदेकडे...

 
 
या निकालात न्यायालयाने कॉपीराईट कायद्यासंबंधी महत्त्वाचे नियम नमूद केले.
 
केवळ संकल्पना, विषय (Theme), ऐतिहासिक घटना किंवा मूळ कल्पनेवर कॉपीराईट मिळत नाही. त्या कल्पनेचे सादरीकरण किंवा अभिव्यक्ती कशी केली आहे, याला कॉपीराईटचे संरक्षण असते.
 
 
एकाच विषयावर दोन वेगवेगळ्या कलाकृती असतील, तर त्यात काही प्रमाणात साम्य असणे स्वाभाविक आहे.
 
 
कॉपीराईटचे उल्लंघन सिद्ध करण्यासाठी दोन कलाकृतींमध्ये केवळ वरवरचे साम्य चालत नाही, तर ’मुख्य कथेची मोठ्या प्रमाणावर चोरी’ झाली आहे (सबस्टेन्शियल सिमिलारिटी टेस्ट) हे सिद्ध व्हावं लागतं.
 
नाटक आणि चित्रपट पाहिल्यानंतर एका सामान्य प्रेक्षकाला ’हा चित्रपट नाटकाचीच हुबेहूब प्रत आहे’ असं वाटतं का? जर दोघांमधील फरक स्पष्ट जाणवत असतील, तर कॉपीराईटचे उल्लंघन होत नाही. हे लक्षात घ्यायला हवं की नाटकाची प्रकृती गंभीर होती आणि सिनेमा विनोदी ढंगाचा होता आणि लोकांनी त्याला दिलेला प्रतिसादही उत्तम होता.
 
 
साम्य असलेल्या मुद्द्यांपेक्षा फरकाचे मुद्दे जास्त आणि महत्त्वाचे असतील, तर चोरीचा उद्देश नव्हता असं मानलं जावं.
 
नाटक आणि चित्रपट यांच्या सादरीकरणाच्या कक्षा वेगवेगळ्या असल्याने त्यात नाट्यमय बदल होणे नैसर्गिक आहे.
 
आर. जी. आनंद विरूद्ध डिलक्स फिल्म्स या प्रकरणाने भारतात Idea-Expression Dichotomy, अर्थात कल्पना विरुद्ध अभिव्यक्ती सिद्धांताची पायाभरणी केली.
 
 
आजच्या काळातही चित्रपट, नाटक, पुस्तके किंवा OTT वरील वेब सीरिजवर जेव्हा कथेच्या चोरीचा किंवा कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप होतो, तेव्हा भारतीय न्यायालये सर्वप्रथम याच खटल्यातील नियमांचा संदर्भ घेतात.
 
 
जिथे कथेची ही गत तिथे गाण्यांची गोष्टही फार वेगळी नाही. सप्तसूर आणि रागदारीच्या पायावर उभ्या राहिलेल्या संगीतविश्वात कितीतरी वेगळा एकसारख्या वाटणार्‍या चाली आलेल्या आहेत.
 
सागर किनारे, दिल ये पुकारे; रहे ना रहे हम मेहका करेंगे; यही जीवन है, इस जीवन का यही है रंग रूप...या गाण्यांत फंडामेंटल सिमिलारिटी नाही असं कोण म्हणेल?
 
मात्र एका रागावर बेतलेल्या चालींत काही भागात असा सारखेपणा येणं वेगळं आणि चोरलेल्या चालींवरून एकाची तीन गाणी करणं वेगळं. ढापून चाली वापरणं हे नि:संशय चुकीचंच आहे.
 
ह्यातून काढला जाणारा राजमार्ग म्हणजे जिथे गरज आहे तिथे पुनर्वापरासाठी किंवा रिमेकसाठी कॉपीराईट योग्य मोबदला देऊन विकत घेणे.
 
 
 
धुरंधरच्या दोन्ही भागांतलं पार्श्वसंगीत जुन्या गाण्यांचं आहे. ते कायदेशीररीत्या वापरता यावं म्हणून आदित्य धर आणि इतर निर्मात्यांनी करोडो रुपये मोजले आहेत. चित्रपटाच्या जमाखर्चातली मोठी रक्कम त्यावर खर्च करण्यात आली. ‘हम देखेंगे’ हे काश्मीर फाईल्समधलं गाणं फैझ अहमद ह्यांची नज्म वापरुन बनवण्यात आलेलं आहे. त्यासाठी पाकिस्तानातल्या त्यांच्या वारसांना संपर्क करून मोबदला देऊन विवेक अग्निहोत्रींनी कॉपीराईटसाठी परवानगी घेतली होती.
 
 
दृश्यमसारख्या चित्रपटाचे विविध भाषांमधले रिमेकही कॉपीराईट परवानगी घेतल्याशिवाय बनत नाहीत. सृजनात्मक कलाकृतींसाठी कॉपीराईट दिला जातो. पण हे कायद्याचं हे सरंक्षण पूर्वी पूर्णतः या स्वरूपाचं नव्हतं.
 
 
सध्याचा जगभरातला कॉपीराईट कायदा हा सृजनाला मान देतो. (आयोटा ऑफ क्रिएटविटी) म्हणजेच एखाद्या कलाकृतीत कल्पकता, अस्सलपणा किती आहे ह्याला महत्त्व दिलं जातं आणि त्या अस्सलपणाचा अंश जाणवला तर त्या कलाकृतीला कॉपीराईट प्रदान करण्यात येतो.
 
 
पूर्वी एखादी गोष्ट घडवण्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे ते पाहण्यावर जास्त भर दिला जायचा. ह्यालाच तांत्रिक संज्ञा (स्वेट ऑफ ब्रो) अशी होती.
 
 
याउलट आयोटा ऑफ क्रिएटिविटी किंवा मॉडिकम ऑफ क्रिएटिविटी हा सिद्धांत कल्पकतेला महत्त्व देतो.
 
 
कॉपीराईटच्या कायद्याचा स्वेट ऑफ ब्रो ते आयोटा ऑफ क्रिएटिविटी हा प्रवास 1900 सालच्या वॉल्टर विरूद्ध लेन खटल्यापासून सुरू झाला आणि त्याला पूर्तता मिळाली ती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने केवळ कष्टावर आधारित असणारा जुना नियम पूर्णपणे रद्द केला आणि कॉपीराईटसाठी ’सर्जनशीलता’ ही घटनात्मक गरज बनवली, तेव्हा फेइस्ट पब्लिकेशन्स आयएनसी विरूद्ध रुरल टेलिफोन सर्व्हिस हा तो खटला!
 
 
’रुरल’ कंपनीने नेहमीसारखी एक टेलिफोन डिरेक्टरी छापली होती. ’फेइस्ट’ या त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीने रुरलच्या डिरेक्टरीमधून नावे, पत्ते आणि फोन नंबर जसेच्या तसे उचलले. ह्यातून निर्माण झालेल्या खटल्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एकमताने फेइस्टच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, फोन नंबरसारख्या तथ्यांवर (Facts) कोणाचाही कॉपीराईट असू शकत नाही. अशा माहितीच्या संकलनाला (Compilation) कॉपीराईट तेव्हाच मिळू शकतो, जेव्हा ती माहिती निवडण्यात किंवा मांडण्यात सर्जनशीलतेचा अंश (Modicum of creativity) दिसून येतो. माहिती केवळ अद्याक्षरांच्या क्रमाने मांडणे ही निव्वळ यांत्रिक प्रक्रिया आहे, त्यात कोणतीही कल्पकता नसल्याने त्याला कॉपीराईट नाकारण्यात आला.
 
 
भारतातला ह्या बाबतीतला महत्त्वाचा खटला म्हणजे ईस्टर्न बुक कंपनी विरुद्ध डी.बी. मोडक (2008). हा खटला भारतातील कॉपीराईट कायद्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जातो. या खटल्याने भारतात कॉपीराईट मंजूर करण्याचे निकष कायमचे बदलले.
 
 
ईस्टर्न बुक कंपनी (EBC ही कायदेशीर क्षेत्रात अत्यंत नामांकित संस्था आहे. ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे संकलन करून सुप्रीम कोर्ट केसेस (SCC) या नावाने लॉ रिपोर्ट (Law Report) प्रकाशित करते. कोर्टाचे मूळ निकाल (Raw Judgments) हे सार्वजनिक दस्तऐवज असतात. ईबीसी या मूळ निकालांमध्ये, शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुका सुधारणे, निकालांना परिच्छेद क्रमांक देणे, अंतर्गत संदर्भ आणि इतर खटल्यांचे दाखले तपासणे व जोडणे अशा अनेक सुधारणा करते.
 
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संपूर्ण निकालाचा अभ्यास करून ’हेडनोट्स’ (Headnotes) आणि सारांश’ (Short Synopses) दिल्याने कायद्याचे विद्यार्थी आणि अधिवक्ते (वकील) ह्यांना निकालाचा अभ्यास करणं अतिशय सोयीचं पडतं.
 
 
प्रतिवादी डी.बी. मोडक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलं. ईबीसीने प्रकाशित केलेले निकाल जसेच्या तसे कॉपी करून त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये वापरले.
 
 
आता जर निकाल न्यायालयानेच दिलेले असतील तर त्यावर ईबीसीचा कॉपीराईट कसा? हा प्रश्न प्रतिवादींनी उपस्थित केला. उलट ईबीसीने केलेले संपादकीय संस्कार ते निकाल समजून घेण्याची प्रक्रिया सोपी करत होते. ह्या तिढ्यातून सर्वोच्च न्यायालयाने उत्तम मार्ग काढला.
 
केवळ परिच्छेद क्रमांक देणे, चुका सुधारणे किंवा फॉन्ट बदलणे या यांत्रिक कामांना (Mechanical exercises) कॉपीराईट संरक्षण नाकारलं. पण मूळ निकालांचे वाचन करून त्यातून ’हेडनोट्स’, सारांश तयार करणे, त्यात कोणते कायदेशीर मुद्दे मांडले आहेत हे शोधणे, यासाठी कायदेशीर कौशल्य, विवेकबुद्धी आणि कल्पकता लागते हे नमूद केलं.
 
 
म्हणूनच न्यायालयाने प्रतिवादींना कोर्टाचे मूळ निकाल वापरण्याची परवानगी दिली. परंतु ईबीसीने तयार केलेले हेडनोट्स, सारांश आणि त्यांनी केलेले कल्पक बदल कॉपी करण्यास सक्त मनाई केली.
 
चित्रपटांपासून ते टेलीफोन डिरेक्टरी किंवा अगदी न्यायालयाच्या निकालपर्यंत प्रत्येक ठिकाणी लागू पडणारा हा बहुआयामी कायदा.उदाहरणं द्यावी तितकी कमी आहेत पण एका वाक्यात ह्याचा सारांश सांगायचा तर नक्कल करायलाही अक्कल लागते!
 
- लेखिका नोंदणीकृत पेटंट एजंट, पीएचडी, एलएलबी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.

डॉ. अपूर्वा फडके

डॉ. अपूर्वा फडके  या नोंदणीकृत पेटंट एजंट, पीएचडी, एलएलबी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.